येवल्यात लग्नाच्या मंडपात राडा, डिझेल ओतून नवरदेवाला आणि त्याच्या आईला जाळण्याचा प्रयत्न
प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या नातेवाइकांनी लग्नसोहळ्यात घुसून मारहाण केली आणि डिझेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळेवर पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात प्रेमविवाहाच्या रागातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुला-मुलीने प्रेमविवाह केला, याचा राग मनात धरून मुलीच्या माहेरच्या नातेवाइकांनी थेट लग्नाच्या मंडपात घुसून गोंधळ घातला. नवरदेव, त्याची आई आणि इतर नातेवाइकांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे येवल्यात आणि आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली असून लोकांमध्ये तीव्र संताप आहे.
नेमकी घटना काय आहे, ते पाहू. येवला शहरात राहणारा ऋषभ दीपक भगुंडे या तरुणाचे निफाड तालुक्यातील एका तरुणीवर प्रेम होते. घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन दोघांनी सप्टेंबर महिन्यात घरातून निघून जात कोर्ट मॅरेज केले होते.
काही काळाने मुलाच्या आई-वडिलांनी मोठा निर्णय घेतला. सगळे विधी आणि रितीरिवाज पाळून दोघांचे पुन्हा थाटामाटात लग्न लावून द्यायचे, असे त्यांनी ठरवले. त्यानुसार येवल्यातील एका मंगल कार्यालयात सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रम मोठ्या आनंदात सुरू असतानाच मुलीचे नातेवाईक आणि काही समाजकंटक अचानक लॉन्समध्ये घुसले.
आत शिरताच त्यांनी वाद घालायला सुरुवात केली आणि बघता बघता तुफान राडा झाला. नवरदेव ऋषभ भगुंडे, त्याची आई आणि तिथे हजर असलेल्या इतर नातेवाइकांना त्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ त्यांच्या अंगावर ओतला आणि त्यांना पेटवून देण्याचा भयानक प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने लग्नसोहळ्यात खळबळ उडाली आणि पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने येवला शहर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. राडा घालणाऱ्या मुलीच्या काही नातेवाइकांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, "मुलगा आणि मुलगी दोघेही सज्ञान म्हणजे कायद्यानुसार प्रौढ आहेत, अल्पवयीन नाहीत, आणि त्यांनी स्वतःच्या मर्जीने कायदेशीर लग्न केले आहे, तर मग इतरांनी आक्षेप घेण्याचे आणि हिंसक होण्याचे कारण काय?" असा सवाल तिथले नातेवाईक आणि नागरिक विचारत आहेत. प्रेमासारख्या पवित्र नात्याला असे हिंसक वळण लागल्याने येवला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.