पुण्यात जमिनीच्या वादातून व्यावसायिकावर कटरने वार, ५० हजारांच्या सुपारीचा संशय; एक अटकेत
जमिनीच्या वादातून व्यावसायिकाचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पुण्यात उघड झाले असून, बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यात जमिनीच्या वादातून एका व्यावसायिकाचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सहकार आयुक्त कार्यालयातील सुनावणी संपवून वकिलासोबत निघालेल्या या व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धारदार कटरने वार केले होते. त्यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे, तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
अटक केलेल्या तरुणाचे नाव आनंद बाबा गव्हाणे (वय १९, रा. गुलटेकडी) असे आहे. हल्ल्यात जखमी झालेले व्यावसायिक जीवन रंगराव सूर्यवंशी (वय ५५, रा. धाराशिव) आहेत.
ही घटना तीन दिवसांपूर्वी, म्हणजे २२ सप्टेंबर रोजी घडली. सहकार आयुक्त कार्यालयातील सुनावणी संपल्यानंतर सूर्यवंशी वकिलासोबत ससून रुग्णालयाच्या दिशेने चालले होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या चेहऱ्यावर धारदार कटरने वार केले. या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यावर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणही केले. त्याच्या आधारे संशयितांचा माग काढत गव्हाणे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून प्रवीण बाळाजी सूर्यवंशी (रा. बाभूळगाव, ता. उमरगा) याचे नाव सांगितले.
आरोपींनी सांगितल्याप्रमाणे, प्रवीण आणि तक्रारदार यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातूनच प्रवीणने तक्रारदाराचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार या दोघांनी हल्ला केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. वार करण्यासाठी वापरलेला कटर मुख्य आरोपीनेच पुरवल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी प्रवीणचा शोध सुरू आहे.
ही कारवाई बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. उपनिरीक्षक राहुल पवार, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, निलेश पालवे, ज्ञाना बडे, महेश जाधव, मनोज भोकरे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.