वर्ध्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर, पण घटलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी
वर्धा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले. खुल्या बाजारात भाव हमीभावापेक्षा वर असले तरी शेतकऱ्यांचा खर्च निघणे कठीण असल्याचे ते सांगतात.
वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. सोयाबीनला ५,७०७ रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. खुल्या बाजारात मात्र त्यापेक्षा एक हजार रुपये अधिक भाव दिला जात आहे. दरवर्षीसारखी बाजारभावाची चिंता शेतकऱ्यांना यंदा नाही. पण उत्पादनच कमी झाल्याने या भावाचा हवा तितका फायदा त्यांना होणार नाही, असे चित्र आहे.
कृषी विभागाने जिल्ह्यात यंदा १ लाख २५ हजार ६५४.९४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस कमी झाल्याने पेरणीला उशीर झाला. त्यामुळे प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ७४०.७० हेक्टरमध्ये पेरणी झाली. दरवर्षी ठरवलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होत असते. यंदा ऑगस्ट महिन्यापासून पाऊस थांबल्याने उत्पादनात मोठी घट झाली.
नवीन सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी शिल्लक राहिलेले थोडे सोयाबीन विक्रीला येत होते. त्याला जवळपास ७ हजार रुपये भाव मिळत होता. आता दसरा आणि दिवाळी जवळ आल्याने शेतात उरलेल्या सोयाबीनची कापणी करून शेतकरी ते बाजारात आणत आहेत. त्यामुळे भाव थोडे खाली आले आहेत. सध्या सोयाबीनला ५,९०० ते ६ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा एक हजार रुपये जास्त मिळूनही उत्पादन खर्च भरून निघणे कठीण जाईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरवर्षी सोयाबीन बाजारात आल्यावर दाण्यात ओलावा असल्याचे कारण सांगून कमी भाव दिला जात होता. नाफेडकडूनही हमीभावापेक्षा कमी भाव दिला जात होता. यंदा दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने कडक उन्हामुळे भरलेल्या शेंगा फुटल्या आहेत आणि दाणे कडक वाळले आहेत. त्यामुळेही बाजारात चांगला भाव मिळत आहे.
नवीन सोयाबीन बाजारात येताच भाव घसरतात, म्हणून हमीभावाने खरेदीसाठी नाफेडची खरेदी सुरू करण्याची मागणी होत असते. यंदा परिस्थिती उलट आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने नाफेडची खरेदी बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे म्हणाले, "सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. अत्यंत दुष्काळ पडलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांत सोयाबीनचे उत्पादनच झाले नाही. त्यामुळे सोयाबीनचा तुटवडा वाढला आहे. त्यामुळे खुल्या बाजारात भाव अधिक मिळत आहे. काही महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने कापूस वाळण्यास सुरुवात होणार आहे. रब्बीचे पीक घेणे अनेक शेतकऱ्यांना शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्याची संपूर्ण भिस्त सोयाबीन पिकावरच आहे."