माजलगावात डिझेलच्या पैशांसाठी रुग्णवाहिका नाकारली, बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप चालत निघाला
दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्रात 11 वर्षांच्या मुलीला रुग्णवाहिकेतून उतरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाईचे सांगितले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दिंद्रूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून एका 11 वर्षांच्या मुलीला आणि तिच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
ही मुलगी गावातील जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकते. 29 सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत असताना तिला अचानक फीट आली आणि ती बेशुद्ध पडली. मुख्याध्यापक मनोहर कटारे आणि इतर शिक्षकांनी तिला तातडीने दिंद्रूडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश ढाकणे यांनी तिला पुढच्या उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचा सल्ला दिला.
या मुलीच्या आईचे छत्र आधीच हरपले आहे. वडील हमाली करतात आणि दोन मुले व दोन मुलींचा सांभाळ करतात. घरात वृद्ध आजी मुलांची देखभाल करते. रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या या कुटुंबाकडे रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते. आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी डिझेलच्या पैशांची मागणी केली, पैसे नसल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले, असे सांगितले जाते. रुग्णवाहिकेच्या चालकानेही मुलीला नेण्यास नकार दिला.
त्यानंतर वडिलांनी बेशुद्ध लेकीला खांद्यावर टाकले आणि ते आरोग्य केंद्राच्या बाहेर चालत निघाले. त्यांच्या मागून आजीही पायी चालत गेली. दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पुढे हे वडील 10 किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालले.
यावेळी आजी भावनिक झाल्या आणि डॉक्टरांना म्हणाल्या, "आमच्याकडे खायलाच पैसे नाहीत, मग डिझेलला कुठून आणून देऊ? चार लेकरांचा सांभाळ कसाबसा करतोय." त्यावर समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांनी "सांभाळ होत नाही तर लेकरे पैदा कशाला करता" असे उत्तर दिले, असे समोर आले आहे.
डॉ. निलेश ढाकणे यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. रुग्णवाहिका गर्भवतींसाठी असते, पण तरीही मी असे बोलायला नको होते, माझी चूक झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले की, डिझेलसाठी पैसे मागणे आणि रुग्णाच्या नातेवाइकांशी उद्धटपणे बोलणे असे कोणी केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई करू. मी सर्व माहिती घेतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरातून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. सरकारी आरोग्य केंद्रातच असे घडत असेल, तर गरिबांनी जायचे कुठे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबन आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.