बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:56 IST

वानाडोंगरीतील महिलेच्या हत्येप्रकरणी प्रियकराला जळगावातून अटक

विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा बनाव उघड झाला असून एमआयडीसी पोलिसांनी काही तासांत आरोपीला जळगावातून ताब्यात घेऊन अटक केली.

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी काही तासांतच केला आहे. मातोश्री ले-आऊटमध्ये झालेल्या या घटनेत सुरुवातीला विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला असावा, असा संशय होता. मात्र प्राथमिक शवविच्छेदन अहवालात तिची हत्या झाल्याचे समोर आले.

मृत महिलेचे नाव कविता गणेश पिंपळशेंडे (वय ३८) असून त्या मातोश्रीनगर येथील रहिवासी होत्या. सोमवारी सकाळी आठ वाजता त्या घरात मृतावस्थेत आढळल्या. स्वयंपाकघरात हीटरवर पाणी गरम होत होते आणि कविता यांच्या अंगावर विजेचा धक्का लागल्याच्या तसेच भाजल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे पोलिसांनी आधी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी मात्र डोक्यावर जोरदार आघात झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निश्चित केले आणि प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विजेचा शॉक लागल्याचे भासवण्यासाठी हीटरचा वापर करून बनाव रचण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले.

या प्रकरणात जावेद शेख शाहिद मन्यार (वय ३३, रा. शिव कॉलनी, जळगाव) याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. तो कविता यांचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येते. जावेद व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे दाखवण्यासाठी त्याने हीटरने शरीराला विजेचे झटके दिले आणि नंतर हीटरवर पाणी गरम ठेवल्याचे नाटक केले, असा आरोप आहे.

सोमवारी सकाळी कविता यांचे पती गणेश यांनी फोन उचलला नाही. म्हणून त्यांनी नातेवाईकांना मुलांना घरी पाठवण्यास सांगितले आणि तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कोठेवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

तपास हत्येच्या दिशेने सुरू झाल्यावर पोलिसांनी सर्वप्रथम पतीकडे चौकशी केली. घटनेच्या वेळी गणेश सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याने भंडारा येथील मूळ गावी होते. त्यांच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर कविता यांच्या मोबाईलचा सीडीआर तपासण्यात आला. त्यात बहुतेक कॉल जावेदला केल्याचे दिसून आले. घटनेच्या वेळी त्याचे मोबाईल लोकेशन वानाडोंगरी येथेच होते, तर सोमवारी सायंकाळी ते जळगाव येथे आढळले.

पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या पथकाने जळगावला जाऊन जावेदला घरातून ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

प्राथमिक तपासानुसार दोघांमधील संबंधांतून वाद झाला होता. संबंध उघडकीस येण्याच्या भीतीने हत्या केल्याचा संशय आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ