पंढरपूर हत्याकांड: म्हातारपणी जडलेल्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट, आजीनंच केला आजोबाचा खून
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या सत्तरीत जुळलेलं प्रेम शेवटी खुनात संपलं असून पोलिसांनी 70 वर्षांच्या एका वृद्ध महिलेला अटक केली आहे.
आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम जडू शकतं, असं म्हटलं जातं. मात्र कधीकधी अशाच अनैतिक प्रेमसंबंधांतून भयंकर गुन्हे घडतात आणि हसती-खेळती कुटुंबं उद्ध्वस्त होतात. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या सत्तरीत जुळलेलं प्रेम शेवटी खुनात संपलं. या प्रकरणी पोलिसांनी 70 वर्षांच्या एका वृद्ध महिलेला अटक केली आहे.
पंढरपूर तालुक्यातले अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध होते. काळ जसा पुढे गेला तसे या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. याच वादातून मंगल हिने अंबादास यांना एका शेतात ठार मारलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह अर्धवट जाळून पुरून टाकला. ही घटना साधारण 27 जुलैला घडल्याचं समोर आलंय.
यानंतर 2 ऑगस्टला गावातल्या काही लोकांना शेतात अर्धवट जळालेल्या आणि पुरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृतदेह अशा अवस्थेत सापडल्यानं गावकरी हादरून गेले आणि त्यांनी लगेच पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं. मृतदेह अर्धवट जळालेला आणि पुरलेला असल्यानं ओळख पटवणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं.
तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आलं की गावातले अंबादास खांडेकर काही दिवसांपासून गायब आहेत. यानंतर पोलिसांनी अंबादास यांच्या दोन्ही मुलींची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. घटना घडून दीड महिना उलटल्यावर या डीएनए चाचणीचा रिपोर्ट आला, आणि तो मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचं स्पष्ट झालं. ओळख पटताच पंढरपूर पोलिसांनी वेगानं तपास करत अवघ्या 12 तासांत आरोपी मंगल होनमाने हिला अटक केली.
पोलीस तपासात हे स्पष्ट झालं आहे की प्रेमप्रकरणातून झालेल्या किरकोळ भांडणातूनच मंगल हिने 70 वर्षांच्या अंबादास यांचा खून केला. मात्र या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला होता, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून खुनामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.