पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले; आणखी दोन आरोपी अटकेत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास वेगाने सुरू आहे. आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातच ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना ठाणे गुन्हे शाखेच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेलमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत अटक केलेल्या आरोपींची एकेक करून चौकशी केली जात आहे. गेल्या सुमारे तीन तासांपासून ही चौकशी सुरू आहे. तपास अधिकारी हत्येशी संबंधित विविध बाबी आणि आरोपींचे जबाब तपासून पाहत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व यापूर्वी DCP अमरसिंह जाधव यांनी केले आहे.
सध्या राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरू आहे. चौकशी संपल्यावर त्यांना घरी जाऊ दिले जाणार, की तपासात समोर येणाऱ्या तथ्यांवरून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, या हत्याकांडात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. चौथा आरोपी संतोष कनोजिया उर्फ 'टल्ली' याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे. त्याचा मित्र आणि हत्येतील फरारी हेल्मेटधारी आरोपी अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू हाही बनारस येथे सापडला. हे दोघे देवाच्या दारात लपून बसले होते. एसआयटीने त्यांना शुक्रवारी (9 ऑक्टोबर 2026) सायंकाळी अटक केली. दोघांना अटक झाल्याने आता पूर्णेकर हत्या प्रकरणातील रहस्य उघड होणार आहे.
एसआयटी पथकाने अटक केलेला फरारी आरोपी संतोष मेहिलाल कनोजिया उर्फ टल्ली हा मूळचा गहनी गावचा आहे. त्याचे पोस्ट अय्यर आणि जिल्हा बनारस आहे. हत्येतील हेल्मेटधारी आरोपी अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू हा रिक्षा चालक असून तो भाईंदरा येथे राहणारा आहे. त्याचे मूळ गाव ग्राम बाबियाव, पोस्ट चोलापूर, जिल्हा बनारस असे आहे.
हत्येनंतर हे दोघेही फरार झाले होते. ते मूळगावी गेले असावेत, या शक्यतेने पोलीस पथक उत्तरप्रदेश आणि भारत-नेपाळ सीमेवर दोन्ही आरोपींचा शोध घेत होते. त्या दरम्यान एसआयटी पथकाला संतोष कनोजिया उर्फ टल्ली सापडला, तर त्याचा मित्र अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू बनारस येथे सापडला.
या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच तीन आरोपींना अटक केली होती. मात्र मुख्य सूत्रधार कोण आणि हत्येमागचे नेमके राजकीय किंवा वैयक्तिक कारण काय, हे अद्याप पूर्णपणे उघड झालेले नाही. संतोष कनोजियाच्या अटकेमुळे हत्येची सुपारी कुणी दिली, कट कसा रचला गेला आणि या सगळ्यामागे मास्टरमाईंड कोण आहे, याबाबतचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.