डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या 'ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व'ला श्रीस्थानक साहित्य पुरस्कार जाहीर
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांचा यंदाचा श्रीस्थानक साहित्य पुरस्कार भद्रावतीतील साहित्यिक प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या पुस्तकाला जाहीर झाला असून २५ ऑक्टोबर २०२६ रोजी तो प्रदान केला जाणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भद्रावती येथील साहित्यिक प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या "ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व" या पुस्तकाला यंदाचा प्रतिष्ठेचा "श्रीस्थानक साहित्य पुरस्कार" जाहीर झाला आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. साहित्यिकांच्या लेखणीला प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने संग्रहालयातर्फे दरवर्षी विविध प्रकारच्या साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येतो.
डॉ. हटवार यांचा हा ग्रंथ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथावर लिहिलेला आहे. ग्रामगीता हा तुकडोजी महाराजांच्या ग्रामीण विकासाचे सूत्र मांडणारा ग्रंथ आहे. त्यातील विचारांची समाजातील प्रत्येक घटकाला आजच्या धावपळीच्या जीवनात किती गरज आहे, हे या पुस्तकात सांगितले आहे.
राष्ट्रसंतांचे विचार कसे पुरोगामी, विज्ञाननिष्ठ आणि विवेकनिष्ठ आहेत, तसेच समाजजीवनाच्या उन्नतीसाठी ते कसे अत्यावश्यक आहेत, याचा सविस्तर उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांनी या पुस्तकाची दखल घेऊन पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार वितरणाचे हे आठवे वर्ष आहे. विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा १५ साहित्य प्रकारांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. हा पुरस्कार मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे मान्यवर थोर साहित्यिक मंडळींच्या हस्ते दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
"अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहात" हा राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. हटवार यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. त्यात ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती प्रतिमा इंगोले, सौ. विनाताई मोहरकर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. सविता सादमवार यांचा समावेश आहे.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, श्रीमती नीलिमाताई शिंदे, विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे यांनीही अभिनंदन केले. त्याचबरोबर डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. राम वासेकर, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, प्रकाशक पराग लोणकर पुणे, डॉ. विठ्ठल चौथाले गडचिरोली, डॉ. पांडुरंग कंद पुणे, प्रा. बाळासाहेब माने मुंबई, प्रा. यश पवार यवतमाळ यांनीही शुभेच्छा दिल्या.
डॉ. शालिनीताई तेलरांधे नागपूर, पवन कटरे गोंदिया, संजय लेनगुरे भंडारा, प्राचार्य सुभाष पारिसे, प्रा. अरूण मेश्राम, प्रा. ओमप्रकाश ढोरे अमरावती, नामदेव मोरे चंद्रपूर यांनीही अभिनंदन केले. विदर्भ साहित्य संघ, झाडीबोली साहित्य मंडळ आणि भद्रावतीतील गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.