पूर्णेकर हत्येचा कट कुठे शिजला? 'पप्प्या'च्या कोठडीत वाढ, दोघे १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची थरारक हत्या झाली. या हत्येचा कट नेमका कुठे आणि कसा शिजला, याचा छडा लावण्यासाठी ठाणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ 'टल्ली' आणि अमितसिंग ऊर्फ 'पपलू' या दोघांना न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुख्य संशयित सुभाष शिंदे ऊर्फ 'पप्प्या' याच्या कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
कोठडी मागताना पोलिसांनी न्यायालयात असा दावा केला की, हत्येच्या वेळी डोक्यात हेल्मेट घालून आलेला हल्लेखोर दुसरा तिसरा कोणी नसून अमितसिंग ऊर्फ पपलूच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच एफआयआरमध्ये नाव असलेल्या टल्लीचाही गुन्ह्यात थेट सहभाग समोर आला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हत्येपूर्वी आरोपींनी सराव कुठे केला आणि त्यांना इतरांची मदत होती का, याचाही तपास होत आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या हत्याकांडात दोन पिस्तुले आणि तीन चॉपर वापरले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी एक पिस्तूल नितेश पवार ऊर्फ भावड्या याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. उरलेले दुसरे पिस्तूल आणि तीन चॉपर अद्याप जप्त व्हायचे आहेत. ही शस्त्रे नेमकी कुठून आणली, ती कोणी पुरवली आणि आर्थिक मदत कोणाची होती, याचा माग पोलीस घेत आहेत. हल्ल्याच्या वेळी आरोपींनी घातलेले कपडे, हेल्मेट आणि त्यांचे मोबाईल फोन जप्त करणे बाकी आहे. दोघांच्या घरांची झडती घेतली जाणार असून बँक खात्यांतील संशयास्पद व्यवहारांचीही तपासणी केली जाणार आहे.
गुन्ह्यानंतर एकमेकांच्या संपर्कात राहता यावे म्हणून मुख्य संशयित पप्प्याने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने मोबाईल आणि सिमकार्ड विकत घेतले आणि ते टल्लीला दिले, असे तपासात समोर आले आहे. पप्प्या पोलिसांची दिशाभूल करत आहे आणि सहकार्य करत नाही, त्यामुळे त्याला इतर आरोपींसमोर बसवून चौकशी केली जाणार आहे.
जयनाथ पूर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी अटक केलेले सर्व प्रमुख आरोपी 'नीळकंठ ग्रीन्स' येथे एकत्र जमले होते. त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि हत्येचा कट त्याच बैठकीत शिजला का, या दृष्टीनेही आता तपास केला जाणार आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.