शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:43 IST

ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांसाठी ४०० कोटींचा आराखडा तयार

ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांसाठी ४०० कोटींचा आराखडा तयार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ठाणे जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नागरी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा विकास आराखडा तयार केला आहे. खासदार आणि दिशा समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा आराखडा बनवण्यात आला आहे.

आराखड्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी सुमारे ३०० कोटी रुपये धरले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढवण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचे नियोजन आहे.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा समिती) आढावा बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच झाली. त्यात विविध कामांचे नियोजन, निधीची उपलब्धता आणि अंमलबजावणी यावर चर्चा झाली. खासदार डॉ. शिंदे यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार हा सर्वसमावेशक आराखडा तयार झाला आहे.

शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची सोय, इंटरनेट जोडणी, आधुनिक व सुसज्ज वर्गखोल्या, आदर्श स्वयंपाकगृहे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन आहे. सक्षम शाळा अभियानांतर्गत गरजेनुसार शाळांची पुनर्बांधणी करून स्मार्ट शाळा उभारल्या जातील.

शाळांच्या परिसरात सौरऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संकलन, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार विश्रांतीगृहे आणि शैक्षणिक व प्रेरणादायी चित्रांनी सजवलेल्या भिंती अशा सुविधाही मिळणार आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम पोषण) योजना प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजन मिळावे, म्हणून आदर्श स्वयंपाकगृहे उभारण्यावर भर द्या, अशा सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.

शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता सतत सुधारण्यासाठी शहरांतील अनुभवी शिक्षकांसह शासकीय आणि खासगी क्षेत्रातील शिक्षकांचे सहकार्य घेतले जाणार आहे. प्रत्येक शाळेची अद्ययावत माहिती ठेवणे, दरवर्षी शाळांचे मूल्यमापन करणे आणि त्यानुसार सुधारणा करणे यावरही भर राहील. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या माध्यमातून निधी उभारून आधुनिकीकरणाची कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

शहरांमध्ये प्रमुख रस्त्यांचे सौंदर्यीकरण, आकर्षक प्रकाशव्यवस्था, तलाव आणि उद्यानांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे, त्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल यावर विशेष लक्ष दिले जाईल. उद्याने आणि सार्वजनिक जागांमध्ये व्यायामाच्या सुविधा, सायकल मार्ग, मुलांसाठी खेळण्याची जागा, आधुनिक व्यायामशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये व अभ्यासिका यांचे नियोजन करण्याच्या सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चांगले पदपथ, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि गरजेच्या पायाभूत सुविधा उभारल्या जातील. महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देणे आणि त्यांच्या उपक्रमांसाठी महिला भवने उभारणे यांचाही आराखड्यात समावेश आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक ठिकाणी सुसज्ज सभागृहे बांधली जातील. दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, पथदिवे आणि स्वच्छता अशा मूलभूत सुविधा देऊन या भागांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर असेल.

या सर्व कामांचे नियोजन करताना नागरिकांच्या दैनंदिन गरजा, सुरक्षितता, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांचा प्रभावी वापर यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आवश्यक निधी आणि प्रशासकीय सहकार्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नियोजित कामे पूर्ण करावीत, असेही बैठकीत सांगण्यात आले.

आरोग्य क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्रे केवळ प्राथमिक तपासणीपुरती न राहता, एकाच छताखाली आवश्यक आरोग्य तपासण्या, उपचार आणि मूलभूत वैद्यकीय सुविधा देणारी सक्षम केंद्रे म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, रुग्णांसाठीच्या सोयी आणि वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारण्याच्या सूचना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ