सुदानमध्ये अबीईच्या बाजारपेठेजवळ ड्रोन हल्ला, किमान १५० जणांचा मृत्यू
अबीई येथील बाजारपेठेजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १५० जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाने किमान १५३ मृत्यूंची माहिती दिली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आफ्रिकेतील सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाने आता भीषण वळण घेतले आहे. अबीई येथील बाजारपेठेजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १५० जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अबीई हा आफ्रिकेतील सुदान आणि दक्षिण सुदान यांच्या सीमेवरचा वादग्रस्त प्रदेश आहे. सध्या हा प्रदेश टोकाच्या हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी तेथील अमिएट बाजारपेठेत ड्रोन हल्ला झाला. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
हल्ल्यानंतर बाजारपेठेतील इंधनसाठ्याला आग लागली आणि त्यामुळे परिस्थिती आणखीनच भीषण बनली. या आगीमुळे अनेक जण गंभीररीत्या भाजले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
हा हल्ला कोणी केला, याबद्दल दोन वेगवेगळ्या बाजू समोर आल्या आहेत. अबीई प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला सुदानच्या लष्कराला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे, सुदानच्या लष्कराशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की इंधनाच्या टँकरना लक्ष्य करण्यात आले होते. हे टँकर आरएसएफच्या ताब्यातील भागाकडे जात असल्याचा लष्कराला संशय होता. मात्र या कारवाईत नागरिकांना लक्ष्य केले नसल्याचा लष्कराचा दावा आहे. तरीही बाजारपेठेतील नागरिकांच्या मृत्यूमुळे या कारवाईबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सुदानमध्ये एप्रिल २०२३ पासून सरकारी लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यात गृहयुद्ध सुरू आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस जास्तच पेटत चालला आहे. सत्तासंघर्षातून सुरू झालेल्या या युद्धाने आता देशाच्या सीमेलगतच्या भागांनाही आपल्या विळख्यात घेतले आहे. खार्तूमकडून असा आरोप केला जात आहे की आरएसएफचे सैनिक दक्षिण सुदानजवळच्या वादग्रस्त भागात लपून बसले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सुदानमध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाला होता आणि त्यात ५१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या हल्ल्याची तीव्रता कमी होते न होते तोच पुन्हा एकदा एवढी मोठी जीवितहानी झाली आहे.
या हल्ल्यामुळे दक्षिण सुदानमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दक्षिण सुदानने सुदानच्या राजदूताला बोलावून घेऊन निषेध नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्रांनीही या हल्ल्याचा निषेध केला असून नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मदतकार्य करणाऱ्या डॉक्टरांकडून जखमींवर उपचार सुरू आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.