शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:52 IST

शिकागोजवळ हिंदू मंदिरात गोळीबाराचा कट, १९ वर्षांचा संशयित शस्त्रांसह पोलिसांच्या ताब्यात

अरोरा भागातील मंदिरावर हल्ला करण्याचा कट आखल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षांच्या तरुणाला सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनंतर अटक झाली आहे.

शिकागो शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या अरोरा भागातील एका प्रसिद्ध हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबार करण्याचा कट आखल्याचा आरोप एका १९ वर्षांच्या तरुणावर आहे. नवरात्रीचा उत्सव सुरू होण्याच्या आदल्या संध्याकाळी हा हल्ला करण्याचे त्याचे नियोजन होते, असे सांगण्यात आले आहे. मात्र त्याने ट्रिगर ओढताच त्याची रायफल तांत्रिक बिघाडामुळे अडकली आणि मोठा नरसंहार टळला. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय आणि हिंदू समाजात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक झालेल्या संशयिताचे नाव अलेक्झांड्रोस पापोराकिस (Alexandros Paporakis) असे आहे. त्याने स्वतःची ओळख 'श्वेतवर्णीय वर्चस्ववादी' (White Supremacist) आणि 'नव-नाझी' (Neo-Nazi) कट्टर विचारांचा समर्थक म्हणून करून दिली आहे. तो गेले काही दिवस अरोरा परिसरातील हिंदू मंदिरांवर पाळत ठेवून होता. धार्मिक उत्सवाच्या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकांना लक्ष्य करण्याचा त्याचा इरादा होता, असे सांगितले जाते.

हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर तो तिथून पळून गेला. त्यानंतर रविवारी त्याने एका फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला मेसेज पाठवून फोन करायला सांगितले. फोनवरच्या बोलण्यात तो मंदिरात गोळीबार करण्यासाठी गेला होता, पण त्याची रायफल चालली नाही, असे त्याने सांगितले. "हिंदूंना आणि भारतीयांना ठार मारण्याची हीच योग्य वेळ आहे आणि मी आता थांबू शकत नाही," असेही तो म्हणाल्याचे सांगण्यात आले.

त्या सहकाऱ्याने बोलण्याचे गांभीर्य ओळखले आणि अजिबात वेळ न घालवता माउंट प्रॉस्पेक्ट पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पॅलाटाईन येथील आरोपीच्या घराबाहेर सापळा रचून त्याला अटक केली. त्याला रोलिंग मेडोज काउंटी न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायाधीशांनी त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात एक सेमी-ऑटोमॅटिक रायफल, भरलेले मॅगझिन, शेकडो जिवंत काडतुसे आणि बुलेटप्रूफ बॉडी आर्मर जप्त करण्यात आले. त्या बॉडी आर्मरवर नव-नाझी आणि श्वेतवर्णीय अतिरेकी संघटनांशी संबंधित चिन्हे आणि चित्रे रेखाटलेली होती. पोलीस प्रशासनाने न्यायालयात सांगितले की, "या धोक्याचे गांभीर्य अत्यंत स्पष्ट आहे; जर बंदूक अडकली नसती तर मोठा अनर्थ घडला असता."

दरम्यान, न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे दूतावासाने कौतुक केले. अमेरिकन प्रशासनाने परिसरातील सर्व हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढवली असून भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ