सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:35 IST

सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर ड्रोन हल्ला, ३० जणांचा मृत्यू; लष्कर आणि RSF मध्ये आरोप-प्रत्यारोप

दक्षिण दारफूर प्रांतातील न्याला शहरातील पशुधनाच्या बाजारावर ड्रोन हल्ला झाला असून त्यात ३० जणांचा जागेवरच मृत्यू झाला. हल्ल्याबद्दल RSF आणि सुदानी लष्कर एकमेकांवर आरोप करत आहेत.

सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर ड्रोन हल्ला, ३० जणांचा मृत्यू; लष्कर आणि RSF मध्ये आरोप-प्रत्यारोप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सुदानमध्ये सुरू असलेले गृहयुद्ध पुन्हा एकदा वेगळे वळण घेत आहे आणि हे युद्ध अधिकच भीषण होत चालले आहे. दक्षिण दारफूर प्रांतातील न्याला शहरात पशुधनाचा मोठा बाजार भरतो. शेती आणि जनावरांवर आपले पोट भरणारे सुदानचे लोक या बाजारात मोठ्या संख्येने खरेदी-विक्री करतात. याच बाजाराला लक्ष्य करून ड्रोन हल्ला करण्यात आला.

शुक्रवारी सकाळी अनेक नागरिक आपापली जनावरे घेऊन बाजारात आले होते. व्यापारीही मोठ्या संख्येने जमले होते आणि सगळ्यांचे सौदे सुरू झाले होते. नेहमीप्रमाणे बाजार चालू होता. तेवढ्यात अचानक वरून जोरात आवाज येऊ लागला आणि बघता बघता ड्रोन बाजारावर येऊन पडला. मोठा स्फोट झाला आणि जागेवरच ३० जणांचा मृत्यू झाला.

या हल्ल्यात ४७ जण जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामुळे अनेक प्राणीही मरण पावले आहेत. RSF च्या प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये १७ महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. निष्पाप माणसे मारली गेल्याचे दुःख सगळीकडे व्यक्त होत आहे आणि सुदानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता सुदानमध्ये शंभर टक्के सुरक्षित असा जवळपास कोणताच भाग राहिलेला नाही.

या हल्ल्यासाठी RSF ने सुदानी लष्कराला जबाबदार धरले आहे. आरोप करताना RSF ने म्हटले आहे की तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर करून बाजाराला लक्ष्य करण्यात आले. सुदानी लष्कराने न्याला शहरातील RSF ची कमांड सेंटर्स आणि लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचे मान्य केले आहे. मात्र बाजारावरील हल्ल्याची जबाबदारी लष्कराने स्पष्टपणे स्वीकारलेली नाही.

एप्रिल २०२३ पासून सुदानमध्ये लष्कर आणि RSF यांच्यात संघर्ष सुरू आहे, म्हणजेच तीन वर्षांपासून तिथे गृहयुद्ध चालू आहे. RSF ही सुरुवातीला सुदान सरकारच्या अखत्यारीत काम करणारी निमलष्करी सेना होती. नंतर RSF ने सुदानच्या लष्करी सेवेत आपल्याला पूर्णवेळ आणि कायमस्वरूपी सैन्य म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली. ती मागणी सुदान लष्कराने फेटाळली आणि तेव्हापासून RSF आणि सुदान लष्कर यांच्यात संघर्ष सुरू झाला.

RSF ही काही सामान्य बंडखोर संघटना नाही. स्वतंत्र लष्करी ताकद, यंत्रणा आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले ते निमलष्करी दल आहे. या संघर्षात सुदानमधील अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था आणि सामाजिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि लाखो लोक आपल्याच देशात विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मते सुदानमध्ये जगातील सर्वात गंभीर मानवतावादी संकटांपैकी एक संकट निर्माण झाले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ