सकाळच्या नाश्त्याला काय खावं सुचत नाही? सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा
वडापाव, मिसळ, मेदूवडा यांऐवजी सकाळी हेल्दी आणि टेस्टी राजगिरा उपमा खा; जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सकाळच्या नाश्त्याला काहीतरी चमचमीत आणि चविष्ट खावंसं सगळ्यांनाच वाटतं. अशा वेळी बहुतेक जण बाहेरून विकतचा नाश्ता आणून खातात. वडापाव, मिसळ, मेदूवडा असे तेलकट आणि तिखट पदार्थ सकाळी नेहमीच खाल्ले जातात.
पण रिकाम्या पोटी तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ले की पचनक्रिया बिघडण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच नाश्त्यात नेहमी हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचा समावेश करायला हवा. वडापाव, मिसळ किंवा मेदूवडा यांसारख्या तेलकट आणि तिखट पदार्थांऐवजी असा एखादा पदार्थ निवडणं जास्त चांगलं.
असाच एक पदार्थ म्हणजे राजगिरा उपमा. आज त्याची सोपी रेसिपी इथे दिली आहे. या पद्धतीने बनवलेला उपमा चवीला खूपच छान लागतो. राजगिरा खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि शरीरालाही फायदे होतात.
सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणं गरजेचं आहे. कारण जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सकाळी जास्त वेळ उपाशी न राहता पोटभर आणि हेल्दी नाश्ता करावा. चला तर मग, रेसिपी बघूया.
साहित्य: या उपम्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे आहे. तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले, कांदा, हिरवी ढोबळी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, राजगिरा, शेंगदाणे, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस.
कृती: स्वादिष्ट राजगिरा उपमा बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरे घालून ते तडतडू द्या. त्यानंतर कढीपत्ता आणि हिंग घाला.
आता या भाजलेल्या मिश्रणात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले आणि कांदा घाला. कांदा लालसर होईपर्यंत हे सगळं परतून घ्या.
कांदा हलका सोनेरी झाला की त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घाला. हे सगळं मंद आचेवर शिजवून घ्या.
मसाले भाजून झाल्यावर भिजवलेला राजगिरा त्यात घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. नंतर तयार झालेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा मंद आचेवर शिजवा.
सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बनवलेला स्वादिष्ट राजगिरा उपमा तयार आहे.