१० मिनिटांत घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी चटपटीत पदार्थ
हॉटेल आणि ढाब्यावर चकणा म्हणून आवर्जून मागवला जाणारा चना कोळीवडा आता कमी साहित्यात घरीच झटपट करता येतो.
खाण्याचा विषय निघाला की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मुंबईच्या स्ट्रीटवर अनेक नवनवीन पदार्थ खायला मिळतात आणि त्यांची चव घेण्यासाठी खवय्ये लांबून मुंबईत येतात.
त्यातला हॉटेलमध्ये मिळणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चना कोळीवाडा. हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर चकणा म्हणून तो आवर्जून मागवला जातो. खमंग आणि चटपटीत काहीतरी खावेसे वाटले की तुम्ही हा पदार्थ घरीच बनवून खाऊ शकता.
सारखे विकतचे पदार्थ आणून खायची अजिबात गरज नाही. अगदी कमी साहित्यात झटपट चना कोळीवाडा होतो. काबुली चणे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. स्नॅक्सला किंवा मुलांना काहीतरी चटपटीत खावेसे वाटले, तर विकतचे देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरी केलेला चना कोळीवाडा द्यावा. चला तर मग, ही रेसिपी पाहूया.
यासाठी लागणारे साहित्य असे: काबुली चणे, मोहरीचे तेल, हळद, लाल तिखट, मीठ, धणे-जिरं पावडर, आलं-लसूण पेस्ट, कॉर्नफ्लोर, बेसन, लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची.
ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा करण्यासाठी सर्वात आधी वाटीभर काबुली चणे घ्या आणि आदल्या दिवशी भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी चणे भिजले की त्यातले पाणी काढून टाका. मग कुकरमध्ये हे भिजवलेले चणे, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घाला, झाकण लावा आणि कुकरच्या २ किंवा ३ शिट्ट्या काढून घ्या.
आता एका वाटीत मोहरीचे तेल घ्या. त्यात हळद, धणे पावडर, जिरं पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि आले, लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट घालून सगळे मसाले एकत्र कालवा. त्यानंतर या मसाल्यांमध्ये कॉर्नफ्लोर आणि बेसन घालून पेस्ट तयार करा. पेस्ट करताना कॉर्नफ्लोर एक किंवा दीड चमचाच टाकावे, जास्त टाकू नये.
शिजवलेले चणे या तयार मसाल्यात टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा. मिश्रणात जास्त पाणी घालू नये.
शेवटी कढईत तेल गरम करायला ठेवा. चणे अलगद तेलात सोडा, त्यात लसूण पाकळ्या टाका आणि चणे मंद आचेवर तळून घ्या. एवढे केले की सोप्या पद्धतीने बनवलेला ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा तयार आहे. हा पदार्थ चकणा म्हणूनही खाल्ला जातो.