विकेंडला मुलांसाठी घरीच बनवा टेस्टी पनीर रॅप
उरलेल्या चपात्यांपासूनही तयार होणारा हेल्दी आणि टेस्टी पनीर रॅप स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे; साहित्य आणि कृती नोट करा.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विकेंडला घरी काही टेस्टी आणि नवीन पदार्थ बनवण्याच्या विचारात असाल, तर पनीर रॅप हा एक चांगला पर्याय आहे. पनीर रॅप हा एक स्ट्रीट फूड आहे आणि बाजारात तो सहज दिसून येतो. लोक मोठ्या आवडीने त्याची चव घेतात. पण बाजारातल्या रॅपमध्ये वापरली जाणारी मैद्याची चपाती आणि पदार्थाची गुणवत्ता हवी तितकी चांगली नसते. म्हणूनच घरीच टेस्टी, हेल्दी आणि स्वच्छतेत स्ट्रीट स्टाईल पनीर रॅप तयार करणे हा चांगला पर्याय ठरतो. स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरणारा आणि मुलांच्या आवडीचा हा पदार्थ विकेंडला करता येईल. रोजच्या चपाती-भाजीऐवजी मुलांना हा रॅप खाऊ घालता येईल.
हा रॅप उरलेल्या शिळ्या चपात्यांपासूनही तुम्ही तयार करू शकता. चला, त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करून घेऊया.
साहित्यात १५० ग्रॅम पनीर लागेल, ते छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. त्याबरोबर गव्हाच्या पोळ्या किंवा चपात्या २-३, एक कांदा (उभा किंवा बारीक चिरलेला), एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि अर्धी शिमला मिरची (उभी पातळ चिरलेली) घ्या. तेल किंवा बटर २ चमचे आणि आलं-लसूण पेस्ट १ छोटा चमचा लागेल.
मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट (लाल मिरची पावडर), १ चमचा धने-जिरे पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ लागेल. रॅपमध्ये लावण्यासाठी मेयोनीज, टोमॅटो केचप आणि हिरवी पुदिन्याची चटणी घ्या.
कृतीची सुरुवात अशी करा. सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून त्यात आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. साधारण १ मिनिटाने त्यात चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून भाज्या हलक्या परता. मग त्यात हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सगळे साहित्य नीट एकत्र करा.
मसाले छान शिजले की त्यात पनीरचे तुकडे घाला, वरून थोडा चाट मसाला टाका आणि झाकण ठेवून २ मिनिटे शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि पनीरचे तयार स्टफिंग थंड होऊ द्या.
आता चपातीवर टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा मेयोनीज समान पसरवून घ्या. त्यावर तयार पनीरचे स्टफिंग पसरवा. लक्षात ठेवा, हे स्टफिंग पोळीच्या एका कोपऱ्याला टाकायचे आहे. हवे असल्यास त्यावर चीजही घालता येईल.
यानंतर पोळीचा छान रोल करा. गॅसवर बटर टाकून हा रॅप त्यावर चांगला शेकून घ्या. खमंग वास आला आणि पोळी बाहेरून हलकी कुरकुरीत झाली की तुमचा पनीर रॅप तयार आहे.