फ्रान्समधील निदर्शनांत आलिशान दुकाने लुटली, चोरीचा माल रस्त्यावर स्वस्तात विक्रीला
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
१७ ऑक्टोबरच्या हिंसक निदर्शनांत अंदाजे ४.२५ दशलक्ष युरोचा (सुमारे ३८ कोटी रुपये) माल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. तोच माल आता रस्त्यावर आणि ऑनलाइन विकला जात आहे.
फ्रान्समध्ये सरकारविरोधी आंदोलन देशभर पसरले असून निदर्शनांना आता हिंसक वळण लागले आहे. युरोपातील सर्वात शांत आणि प्रगत देशांपैकी एक अशी फ्रान्सची ओळख आहे, पण सध्या तिथे सामाजिक आणि राजकीय अशांतता दिसत आहे. आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक आणि तोंडावर मुखवटे घातलेल्या गटांनी प्रमुख शहरांतील अति-आलिशान ब्रँड्सच्या दुकानांना लक्ष्य केले. पॅरिस, मार्सेल आणि बोर्डो या शहरांत झालेल्या तोडफोडीत लाखो युरो किमतीचा डिझायनर माल लुटला गेला.
१७ ऑक्टोबरला झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये उच्चभ्रू दुकानांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्या एकाच दिवसात अंदाजे ४.२५ दशलक्ष युरो, म्हणजे सुमारे ३८ कोटी रुपये किमतीचा माल चोरीला गेला. लुटलेल्या मालात फक्त कपडे किंवा साध्या वस्तू नाहीत. जगातील सर्वात महागड्या ब्रँड्सच्या डिझायनर हँडबॅग्ज, आलिशान घड्याळे, महागडे परफ्यूम्स आणि कॉस्मॅटिक्स यांचा त्यात समावेश आहे.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मार्सेलमधील प्रसिद्ध रोलेक्स (Rolex) घड्याळांच्या शोरूमची तोडफोड झाली आणि सुमारे ३ दशलक्ष युरोचे नुकसान झाले. बोर्डोमधील लुई व्हिटॉन (Louis Vuitton) च्या दुकानातून अंदाजे १.२५ दशलक्ष युरो किमतीचा माल नेला गेला. सेलीन (Celine), हर्मेस (Hermès) आणि डिओर (Dior) या ब्रँड्सनाही या हिंसाचाराचा थेट फटका बसला.
मास्क घातलेल्या आणि चेहरा झाकलेल्या टोळक्यांनी दुकानांच्या काचा फोडल्या आणि काही मिनिटांतच संपूर्ण शोरूम रिकामे केले. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्यात लोक हातात महागड्या हँडबॅग्ज आणि घड्याळांचे बॉक्स घेऊन पळताना स्पष्ट दिसतात. यामुळे फ्रान्समधील व्यापाऱ्यांमध्ये मोठी घबराट आणि संताप आहे.
दुकानांतून माल लुटल्यानंतर आता या लोकांनी वेगवेगळ्या शहरांत रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर आणि गल्लीबोळात अनधिकृत दुकाने थाटल्याचे अनेक व्हिडिओंत दिसते. ज्या हँडबॅग्ज आणि परफ्यूम्सची मूळ किंमत लाखांच्या घरात आहे, त्या नेहमीच्या किरकोळ किमतीपेक्षा ८० ते ९० टक्के सवलतीत विकल्या जात आहेत. काही विक्रेते रस्त्याने जाणाऱ्यांना अडवून या वस्तू अगदी कमी किमतीत घ्यायला सांगत आहेत. काही व्हिडिओंत खरेदीदार आणि विक्रेते भाव करताना दिसतात. मात्र सोशल मीडियावर दिसणारे सगळे सामान खरोखर लुटलेले आहे की बनावट (First Copy) आहे, हे फ्रान्सचे पोलीस सध्या तपासत आहेत.
चोरीच्या मालाची विक्री इंटरनेटवरही करायचा प्रयत्न झाला. जुन्या आणि वापरलेल्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी युरोपात खूप लोकप्रिय असलेल्या विंटेड (Vinted) या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अशा संशयास्पद उत्पादनांच्या जाहिरातींचा पूर आला होता. हिंसाचार शांत झाल्यानंतर काही तासांतच लुई व्हिटॉन आणि हर्मेसच्या ब्रँडेड बॅग्सच्या अनेक नव्या जाहिराती तिथे दिसू लागल्या. त्या जाहिराती लुटलेल्या मालाशी संबंधित असल्याचा संशय बळावला.
त्यानंतर विंटेड कंपनीने लगेच निवेदन काढले. चोरीच्या किंवा बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या वस्तूंची विक्री आमच्या प्लॅटफॉर्मवर चालणार नाही, असे सांगत कंपनीने अशा संशयास्पद खात्यांवर आणि जाहिरातींवर बंदी घालायला सुरुवात केली आहे. पोलीस आणि सायबर सेलच्या मदतीने या जाहिराती टाकणाऱ्या युजर्सचा शोध घेतला जात आहे.
या परिस्थितीमुळे फ्रान्समध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. व्यापारी संघटनांनी सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची आणि लुटारूंवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. फ्रान्सचे पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील व्हिडिओंच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.