फ्रान्समध्ये महागाईविरोधात लाखो नागरिक रस्त्यावर; मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन दरवाढीशी संबंध मॅक्रॉन यांनी
इंधन आणि गॅस दरवाढ, महागाई, बेरोजगारी यामुळे युरोपात लोक रस्त्यावर उतरले असून १७ ऑक्टोबरच्या फ्रान्समधील देशव्यापी निदर्शनात गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सुमारे ५ लाख ५० हजार नागरिक सहभागी झाले होते.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मध्यपूर्वेतील संघर्ष म्हणजेच युद्ध वाढले असून, जे काही सोसायचे होते ते सोसून झाल्यावर आता मात्र युरोपातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. एकाच वेळी इटली, फ्रान्स, अल्बानिया, पॅरिस आणि पोर्तुगाल इथे लोक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या शिक्षण, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार तसेच इंधन आणि गॅसच्या दरवाढीमुळे जनतेत नाराजी आहे. जागोजागी आंदोलक पोलिसांशी संघर्ष करत आपला निषेध नोंदवत आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील भांडणामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः होर्मूझमधील वाहतुकीवर संकट आल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.
याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या असून त्याचा परिणाम फ्रान्समधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होत आहे. इंधन महागल्याने वाहतूक, मालवाहतूक आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्याही किमती वाढल्या आहेत. याचा थेट फटका आता फ्रान्समधील सामान्य नागरिकांना बसत आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनीही मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन दरवाढीशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे. या सगळ्यामुळे जगभरात आता या युद्धाची गरज नसून उगाच हे युद्ध आमच्यावर लादले गेले आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. तसेच काहींच्या मते याला नेतन्याहू आणि ट्रम्प जबाबदार आहेत, कारण त्यांनी कारण नसताना इराणसोबत युद्ध सुरू केले. अशा चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहेत.
१७ ऑक्टोबर रोजी फ्रान्समध्ये देशव्यापी निदर्शने झाली. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या आंदोलनात सुमारे ५ लाख ५० हजार नागरिक सहभागी झाले होते. सुरुवातीला शाळांमधील शिक्षकांची कमतरता, शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या यावरून आंदोलन सुरू झाले होते. पुढे ते महागाई आणि इंधन दरवाढीविरोधातील व्यापक आंदोलन बनले.
काही शाळांमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरू झाला. दुकानांची लुटालूट सुरू झाली, तोडफोड सुरू झाली आणि सार्वजनिक इमारतींची जाळपोळ अशा घटनाही घडल्या आहेत.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम कमी करण्यासाठी फ्रान्सने G7 देशांसोबत ऊर्जा पुरवठ्याबाबत समन्वय साधला आहे. यामध्ये तेलाचे साठे पुन्हा उपलब्ध करण्याबाबत आणि होर्मूझमधील जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यावर भर देण्यात आला आहे.
मात्र महागाई, वाढता जीवनावश्यक खर्च आणि सार्वजनिक सेवांमधील त्रुटी यामुळे नागरिकांमधील नाराजी कायम आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचा आर्थिक परिणाम फ्रान्सच्या अंतर्गत राजकारणासाठीही मोठे आव्हान ठरत आहे आणि मॅक्रॉन यांच्यासमोर आर्थिक आणि राष्ट्रीय संकट उभे राहिले आहे.