फ्रान्समध्ये महागाईविरोधात आंदोलनाचा भडका, मार्सेलमध्ये पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड
वाढती महागाई, इंधनाचे वाढते दर आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्या यांच्याविरोधातील आंदोलनाने शनिवारी १७ ऑक्टोबरला फ्रान्समध्ये हिंसक वळण घेतले. मार्सेलमध्ये पोलीस ठाण्यात तोडफोड झाली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
फ्रान्समध्ये वाढती महागाई, इंधनाचे वाढते दर आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्या या सगळ्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने शनिवारी, १७ ऑक्टोबरला हिंसक वळण घेतले आहे. देशात हजारो लोक रस्त्यावर उतरले असताना दक्षिण फ्रान्समधील मार्सेल शहरात परिस्थिती आणखीच चिघळली आहे.
मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेलाचे संकट वाढले आहे. तेल हे जगण्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींशी जोडलेले असल्याने त्याचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांवर होत आहे. त्यामुळे जगभरात जीवनावश्यक गोष्टींच्या किमती वाढल्या असून अनेक देश यात भरडले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर फ्रान्समधील आंदोलन पेटले आहे.
मार्सेल शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट सुरू आहे. अश्रुधुराच्या नळकांड्यांची इकडून तिकडे फेकाफेकी होत आहे. आंदोलक रस्त्यात येईल ती सरकारी मालमत्ता पेटवून देत असून अशा प्रकारे आपला राग व्यक्त करत आहेत. पोलिसांनाही जोरदार मार दिला जात आहे.
मार्सेलमधील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी ला कानेबिएर परिसरातील महापालिका पोलीस ठाण्यावर हल्ला केला. आंदोलक इमारतीत घुसले आणि तिथे तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे शहरातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केल्याचे वृत्त आहे.
नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि कमी होत चाललेली त्यांची कमाई ही त्यामागची कारणे आहेत. याच मुद्द्यांवरून यलो व्हेस्ट चळवळीशी संबंधित आंदोलकांनी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र केले आहे. म्हणजेच ही चळवळ पुन्हा रस्त्यावर आली आहे.
फ्रान्समधील या आंदोलनाला विद्यार्थी, कामगार संघटना आणि विविध सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळाला आहे. देशभरात हे आंदोलन आता गाजत आहे आणि देशाबाहेरही त्याची चर्चा होताना दिसत आहे. मॅक्रोन यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.
देशभरात ८० हून जास्त मोर्चे आणि शेकडो निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या सगळ्या समस्यांविरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे. एकूणच महागाई, इंधनाचे दर आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्या या मुद्द्यांवर फ्रान्समधील लोक एकत्र आलेले दिसत आहेत.