ऑक्टोबरच्या मध्यावर राज्यात उन्हाचा चटका; रत्नागिरीत सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमान
रत्नागिरीत सोमवारी राज्यातील सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, मुंबईत पुढील दोन दिवस उन्हाचा चटका अधिक जाणवणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. ऑक्टोबरच्या मध्यावरच राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, सोमवारी रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऑक्टोबरमधील उन्हाची तीव्रता सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. वैशाख महिन्यात जाणवणारा वणव्याचा चटकाही फिका पडावा, अशी परिस्थिती काही भागांत निर्माण झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार नंदुरबार येथे ३८.९ अंश, हर्णे येथे ३८.५ अंश, मालेगाव येथे ३८.४ अंश, तर मुंबईतील सांताक्रूझ येथे ३८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. ठाणे-बेलापूर येथे ३८ अंश, तर सोलापूरमध्ये ३७.९ अंश तापमानाची नोंद झाली. जळगावमध्येही पारा ३७.४ अंशांवर पोहोचला. मुंबईच्या कुलाबा केंद्रात ३६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हर्णे येथे १२ ऑक्टोबर रोजी कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हे गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च कमाल तापमान असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. या आकडेवारीतून ऑक्टोबरच्या मध्यावर राज्यातील तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसते. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली नसल्याने उष्णतेचा प्रभाव कायम आहे. ऑक्टोबरमध्येही तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंशांच्या आसपास पोहोचत असल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईकरांनाही उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवणार आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर मुंबईकरांना उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि परिसरात तापमानाचा उच्चांक अनुभवायला मिळू शकतो. मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात १३ आणि १४ ऑक्टोबरला कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पारा ३९ अंशांपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर मात्र तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान कमाल तापमान ३६ ते ३७ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. मात्र, दिवसा तापमान कमी होऊ लागले तरी आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
राज्यातून मान्सून माघारी फिरल्यानंतर आता ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पुन्हा पावसाचे संकेत मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणीतील अंदाजाच्या नकाशानुसार, २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दिसत आहे. दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच सध्याच्या उन्हाच्या झळांनंतर ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.