रेल्वेच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस, मंत्रिमंडळाची मंजुरी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे 11 लाख 40 हजार 770 रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता आधारित बोनसला मंजुरी दिली असून त्यासाठी 2,009.61 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
भारतीय रेल्वेच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिव्ह बोनस जाहीर करण्यात आला. देशातील सर्व पात्र नॉन-गॅझेटिड रेल्वे कर्मचाऱ्यांना 'उत्पादकता आधारित बोनस' (PLB) देण्यास सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान म्हणून 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मंजूर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
या निर्णयाचा थेट लाभ देशातील सुमारे 11 लाख 40 हजार 770 रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार एकूण 2,009.61 कोटी रुपये देणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांना हा बोनस दरवर्षी दुर्गा पूजा/दसरा सुट्ट्यांपूर्वी दिला जातो. यंदाही सुमारे 11.40 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी रक्कम दिली जात आहे. रेल्वेची कामगिरी सुधारण्यासाठी काम करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या बोनसचा उद्देश आहे.
78 दिवसांसाठी प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला मिळणारी कमाल रक्कम 17,951 रुपये आहे. ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट्स, ट्रेन मॅनेजर्स गार्ड्स, स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉइंट्समन, लिपिकीय कर्मचारी आणि इतर गट-सी कर्मचारी अशा विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळेल.
2025-26 या वर्षात रेल्वेची कामगिरी अत्यंत चांगली राहिली. रेल्वेने 1,670 दशलक्ष टन मालवाहतुकीचा विक्रम केला आणि सुमारे 7.41 अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.
दरम्यान, रेल्वे युनियन्स आणि कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना बोनसच्या गणनेसाठीची किमान वेतनमर्यादा वाढवावी, अशी सातत्याने मागणी करत आहेत. सध्या 7 हजार रुपयांच्या मूळ वेतनावर बोनसची गणना होते. महागाई लक्षात घेऊन ही मर्यादा 18 हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसे झाल्यास भविष्यात कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
यापूर्वी अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनसची गणना 7,000 रुपयांची वेतनमर्यादा आणि 78 दिवसांच्या पगारावर आधारित होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वार्षिक 17,951 रुपये बोनस मिळत होता. इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशनने (IRTSA) वेतनमर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. लेव्हल 2 आणि त्यावरील कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 18,000 रुपये अधिक महागाई भत्ता (DA) पर्यंत वाढवावी, असे संघटनेने म्हटले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध वेतन स्तरांनुसार बोनसची गणना करावी, अशी सूचनाही संघटनेने केली आहे.