आई आजारी पडल्यावर १४ वर्षांच्या रूचितने सांभाळलं किचन, चपात्याही केल्या
निशा तनवर यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांचा १४ वर्षांचा मुलगा रूचित पीठ मळताना आणि चपात्या लाटताना दिसतो.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
घरातली आई आजारी पडली की सगळ्या घराचं गणित बिघडतं. रोज सकाळी उठून सगळ्यांसाठी डबा, नाश्ता आणि जेवण करणारी आई अंथरुणावर असली की तिची खरी किंमत कळते. अशा वेळी घरातला मुलगा पुढे येऊन "आई, तू आराम कर, आजचं जेवण मी बनवतो" असं म्हणाला, तर आईसाठी याहून आनंदाचा क्षण दुसरा नसेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोकांच्या मनाला भिडतो आहे.
या व्हिडिओत १४ वर्षांचा रूचित आईच्या आजारपणात किचन सांभाळताना दिसतो. त्याने पूर्ण जबाबदारी घेतली आणि सगळं जेवण तयार केलं. त्याच्या आईनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हा व्हिडिओ निशा तनवर नावाच्या महिलेने त्यांच्या इंस्टाग्रामवर टाकला आहे. त्यात त्यांचा मुलगा रूचित किचनमध्ये पीठ मळताना दिसतो. निशा यांनी सांगितलं की त्यांना खूप सर्दी आणि खोकला झाला होता. खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. बेडवरून उठणंही कठीण वाटत होतं. तेव्हा रूचित स्वतःहून पुढे आला आणि "मी करतो" असं म्हणाला.
व्हिडिओत तो अगदी सफाईने पीठ मळतो आणि चपात्या लाटतो. तो पहिल्यांदाच किचनमध्ये आलाय असं बघून वाटतच नाही.
रूचितच्या आईने सांगितलं की त्याला फक्त पीठ मळता येतं असं नाही, तर चपात्याही छान बनवता येतात. एवढंच नाही, तो भाजी बनवायलाही शिकतोय. हळूहळू किचनमधली बाकीची कामंही तो शिकतोय. त्याच्यासाठी किचनमध्ये जाणं नवीन नाही, तो आधीपासूनच आईला मदत करत असतो.
आपल्याकडे अजूनही बऱ्याच घरांत मुलींना लहानपणापासून किचनची कामं शिकवली जातात, पण मुलांना लांब ठेवलं जातं. "तू हे करू नको, ताई करेल, तू कशाला किचनमध्ये आलास" असं अनेकदा महिला आपल्या मुलांना सांगतात. घरकाम करणं लाजेची गोष्ट नाही. स्वतःच्या घराची जबाबदारी घेणं आणि आईला मदत करणं यातच खरं मोठेपण आहे. घर फक्त आईचं किंवा बहिणीचं नसतं, ते घरात राहणाऱ्या प्रत्येकाचं असतं आणि त्याची काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी फक्त रूचितचं नाही, तर त्याच्या आईचंही खूप कौतुक केलं. मुलावर असे संस्कार करणं सोपं नाही. मुलाला लहानपणापासून सगळी कामं शिकवणं आणि मुलगा-मुलगी असा भेदभाव न करणं हे या आईने केलं आहे. कमेंटमध्ये लोक म्हणत आहेत की "प्रत्येक आईने आपल्या मुलाला असंच शिकवलं पाहिजे." मुलींप्रमाणे मुलांनाही घरातल्या कामांत, विशेषतः किचन सांभाळण्यात, सहभागी केलं पाहिजे, असंही लोक म्हणतात.
या छोट्या व्हिडिओने समाजाला मोठा संदेश दिला आहे. मुलांनाही स्वयंपाक शिकवा आणि त्यांना घरकामाची सवय लावा. उद्या ते एकटे राहिले तरी त्यांना कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही आणि घरच्यांना मदतही करता येईल. रूचितसारखी मुलं आजकाल खूप कमी बघायला मिळतात आणि म्हणूनच त्याचं कौतुक जास्त होत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.