सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:18 IST

मूलमध्ये दुर्गा विसर्जनात आवाजाची मर्यादा ओलांडली, पाच जणांवर गुन्हा

दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याने मूल पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष आणि डीजे मालक-चालकांवर गुन्हा नोंदवला असून ८५ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मूलमध्ये दुर्गा विसर्जनात आवाजाची मर्यादा ओलांडली, पाच जणांवर गुन्हा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवल्याप्रकरणी मूल पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईत डीजे साहित्यासह पाच वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत ८५ लाख २१ हजार रुपये आहे. आरोपींमध्ये मंडळाचे अध्यक्ष आणि डीजे मालक-चालक यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक निघाली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष गस्त आणि तपासणी मोहीम राबवली होती.

या मोहिमेत मूल शहरातील गांधी चौक परिसरात 'दरार दुर्गा मंडळ'च्या विसर्जन मिरवणुकीतील डीजे वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलीस पथकाने ध्वनीमापक यंत्राने (Sound Level Meter) आवाज मोजला. त्यात या वाहनांवरील साऊंड सिस्टीमचा आवाज विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी डीजे चालक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाज तात्काळ कमी करण्याबाबत स्पष्ट व कायदेशीर सूचना दिल्या होत्या. तरीही त्यांनी पोलिसांच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून मोठा आवाज सुरूच ठेवला, असा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी लगेच कायदेशीर कारवाई केली.

गुन्हा नोंदवलेल्यांमध्ये दरार दुर्गा मंडळाचे अध्यक्ष संतोष प्रभाकर ठाकूरवार (वय ५१, रा. मूल), डीजे मालक तथा चालक अनिकेत रवी ननावरे (वय २२), अभिषेक चंद्रशेखर चिट्टलोजवार (वय २२, रा. मूल), डीजे धुमाळचे मालक तथा चालक धीरज जुगलकिशोर घिचरे (वय ५१, रा. मानेवाडा, नागपूर) आणि डीजे मालक तथा चालक लकी अनिल दुर्गे (वय १९, रा. बोरचांदली, ता. मूल) यांचा समावेश आहे.

विहित मर्यादा ओलांडून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी आणि पोलिसांच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मूल पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ७३२/२०२६ नोंदवण्यात आला आहे. यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३८ आणि १३६ लावण्यात आले आहे.

आरोपींच्या ताब्यातील डीजे साहित्यासह एकूण पाच वाहने जप्त करण्यात आली असून या मुद्देमालाची किंमत ८५ लाख २१ हजार रुपये आहे. गणेश आणि दुर्गा उत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर पोलीस कठोर भूमिका घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नियमबाह्य डीजे वाजवणाऱ्यांमध्ये त्यामुळे चांगलीच धास्ती पसरली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ