अभिजित केळकर यांना जिवाला धोका; मालाडमधील घरांबाबत बिल्डरवर आरोप
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मालाड (पूर्व) येथील पुष्पापार्क, बाणडोंगरी भागातल्या वडिलोपार्जित घरावरून अभिनेता अभिजित केळकर यांनी फेसबुक पोस्टमधून बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदत मागितली आहे.
अभिनेता अभिजित केळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील मालाड (पूर्व), पुष्पापार्क, बाणडोंगरी भागात त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्या घरावर एका बिल्डरचा आणि स्थानिक लोकप्रतिनिधीचा डोळा असून लोकांची घरे बेकायदेशीरपणे तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी केळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट मदत मागितली आहे.
पोस्टमध्ये त्यांनी प्रकल्पाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या जागेत ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे NOC घेतलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जागेचे मालक कोर्टात गेले आहेत. उद्या सगळे जमीनदोस्त केल्यानंतर कोर्टाने प्रोजेक्टलाच स्टे दिला, तर लोकांना ना घरे मिळणार ना भाडे, मग हा प्रकल्प कसा होणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
बाजूला मिलिटरी कॅम्पस आहे, असेही त्यांनी लिहिले आहे. COD नुसार ठराविक हद्दीत ठराविक उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधायला परवानगी असूच शकत नाही, असे ते म्हणतात. घरे जमीनदोस्त केल्यानंतर डिफेन्सने objection घेतले, तर मग हा प्रकल्प कसा होणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
स्थानिक लोकांना बिल्डरचे गुंड रोज रात्रंदिवस येऊन धमक्या देतात आणि घरे रिकामी करायला लावतात, असा आरोप केळकर यांनी केला आहे. अर्धवट डॉक्युमेंट्स करून ही जागा तातडीने अर्धवट तोडली जात आहे, असेही ते म्हणतात. गेली ५०-६० वर्षे तिथे राहिलेल्या, पण बिल्डरला न घाबरणाऱ्या लोकांना SRA कडून अपात्र ठरवण्यात आले आहे. दुसरीकडे गावगुंडांनी तिथे अनधिकृत झोपड्या बांधून त्या पात्र करून घेतल्या आहेत, हा SRA चा कारभार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तिकडच्या so called लोकप्रतिनिधींना त्यांनी सर्वांच्या साक्षीने विचारले आहे की, आम्हा चाळीतल्या लोकांना त्यांची हक्काची घरे मिळतील का, आणि अपात्र ठरवलेल्या लोकांना ते पात्र करतील, याची जबाबदारी ते घेताहेत का? तसे लेखी देत असतील, तर ते म्हणतील तिकडे आम्ही सह्या करू, असेही केळकर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असल्याचे सांगत केळकर म्हणाले, "माझ्या जीवाला धोका आहे, मी घरी आई, बायको आणि मुलांना सांगूनच बाहेर पडलो आहे." कोणाचेही नाव न घेता आपण न्यायासाठी लढत असल्याचे त्यांनी सांगितले आणि आपल्याला हक्काची घरे मिळावीत, अशी मागणी केली. त्यांच्या या पोस्टमुळे सिनेसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.