मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ नव्याने उभारणार, डिसेंबर २०३० पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ च्या पुनर्विकासाची संकल्पना विमानतळ प्रशासनाने मांडली आहे. विमानतळ एअरलाइन ऑपरेटर्स कमिटीसोबत झालेल्या बैठकीत नव्या टर्मिनलच्या वास्तुशिल्पीय रचनेची कलात्मक प्रतिकृती दाखवण्यात आली. आधुनिक सुविधा, प्रवाशांसाठी अधिक सोयीचा अनुभव आणि मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचे दर्शन घडवणारे टर्मिनल उभारण्याचे नियोजन आहे.
प्रशासनाच्या वेळापत्रकानुसार एप्रिल २०२७ मध्ये जुन्या टर्मिनलच्या पाडकामाला सुरुवात होणार आहे. नव्या टर्मिनलचे काम डिसेंबर २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सध्याचे टर्मिनल १ १९६४ मध्ये सुरू झाले होते. सुमारे सहा दशकांनंतर ते कालबाह्य झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्ट्रकवेलने २०१७ मध्ये आणि आयआयटी मुंबईने २०२४ मध्ये केलेल्या स्वतंत्र संरचनात्मक लेखापरीक्षणांमध्ये सुरक्षेशी संबंधित आणि संरचनात्मक त्रुटी समोर आल्या, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे जुन्या टर्मिनलच्या जागी आधुनिक सुविधा उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
नव्या टर्मिनलच्या संकल्पनेत प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रस्थान क्षेत्रात भव्य प्रवेशद्वार, नैसर्गिक प्रकाशाने उजळणारा प्रशस्त चेक-इन हॉल आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृती व भित्तिचित्रे असतील. प्रतीक्षा क्षेत्रात अंतर्गत हिरवळ, प्रीमियम लाउंज आणि धावपट्ट्या दिसतील असे मोठे काचेचे दर्शनी भाग मांडण्यात आले आहेत. आगमन क्षेत्रात मुंबईच्या जैवविविधतेचे प्रतीक असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्याचे भव्य शिल्प उभारण्याची कल्पना आहे.
पुनर्विकसित टर्मिनल १ ची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सध्याच्या १.५ कोटींवरून २ कोटी प्रवाशांपर्यंत वाढवली जाणार आहे. म्हणजे क्षमतेत सुमारे ३३ टक्के वाढ अपेक्षित आहे. तपासणी आणि चेक-इन वेगवान करण्यासाठी चेक-इन काउंटर ७४ वरून १०९ पर्यंत वाढवले जातील. सुरक्षा तपासणी सुविधाही मोठ्या प्रमाणात वाढणार असून, प्रवाशांसाठी १५ आणि ट्रान्सफर प्रवाशांसाठी पाच, असे एकूण २० सुरक्षा तपासणी मार्ग प्रस्तावित आहेत.
रिमोट बोर्डिंगवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी थेट विमानाशी जोडलेल्या कॉन्टॅक्ट स्टँडची संख्या सातवरून २५ पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. पारंपरिक बोर्डिंग गेट्सच्या जागी १२ अत्याधुनिक ई-गेट्स बसवले जातील. सामान मिळवण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी बॅगेज रीक्लेम बेल्ट पाचवरून ११ पर्यंत वाढवले जाणार आहेत.
टर्मिनल १ च्या पुनर्विकासादरम्यान मुंबईतील देशांतर्गत विमानसेवा सुरळीत राहावी, यासाठी टप्प्याटप्प्याने संक्रमण करण्याचे नियोजन आहे. जुन्या टर्मिनलचे पाडकाम सुरू झाल्यावर देशांतर्गत प्रवासी वाहतुकीचा वाढीव भार सांभाळण्यासाठी टर्मिनल २ च्या उत्तर-पश्चिम पिअरचा जी+३ पद्धतीने विस्तार केला जाईल. हा विस्तारित भाग मार्च २०२९ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर जुन्या टर्मिनलच्या जागी नवे टर्मिनल १ उभे राहील आणि डिसेंबर २०३० पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पुनर्विकासामुळे मुंबई विमानतळाची एकूण वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता ६.५ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.