माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पिंक लाईन मेट्रो ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी सुरू होणार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे मेट्रो लाईन-३ चे लोकार्पण ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे. प्रवासी सेवा ४ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता सुरू होईल.
पुणे मेट्रो लाईन-३ म्हणजेच माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेचे लोकार्पण ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार या सोहळ्याला प्रमुख उपस्थित राहतील. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम होईल. प्रत्यक्ष प्रवासी सेवा ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.
ही माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी आणि पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण यांनी दिली. शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितले.
डॉ. चौधरी यांनी सांगितले की, ही २३.२०३ किलोमीटर लांबीची संपूर्णतः उन्नत मार्गिका असून तिला 'पुणेरी मेट्रो' आणि 'पिंक लाईन' असेही म्हणतात. माणपासून सुरू होऊन हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमार्गे ती शिवाजीनगरला पोहोचते. भूसंपादन आणि विविध सेवा-सुविधांच्या स्थलांतरासह प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८,३१३ कोटी रुपये आहे. केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण, २०१७' अंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर डीबीएफओटी पद्धतीने राबवला जाणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. पीएमआरडीएसोबतच्या सवलत करारानुसार टीआरआयएल अर्बन transport प्रायव्हेट लिमिटेड आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स जीएमबीएच यांच्या सहभागातून स्थापन झालेली पीआयटीसीएमआरएल ही विशेष उद्देश कंपनी प्रकल्प राबवत आहे.
एकूण २३ स्थानकांपैकी १७ स्थानके ३ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली होतील. त्यातील स्थानक क्रमांक १, २, ३, ५, ६, २१ आणि २३ या सात स्थानकांवर एकच जिना सुरू असेल. स्थानक क्रमांक ४, ७, ८, ९, १०, ११, १२, १७, १८ आणि १९ या दहा स्थानकांवर दोन्ही जिने खुले असतील. उरलेल्या सहांपैकी १३ आणि १४ क्रमांकाची स्थानके नोव्हेंबर २०२६ अखेर पूर्ण होतील, तर १५, १६, २० आणि २२ ही चार स्थानके जानेवारी २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने सेवेत येतील.
सैनी यांनी सांगितले की, पहिली मेट्रो सकाळी ६ वाजता सुटेल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता, तर जिल्हा न्यायालय स्थानकावरून माणच्या दिशेने शेवटची मेट्रो रात्री ११.४० वाजता सुटेल. गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी आणि इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो मिळेल. जिल्हा न्यायालय (शिवाजीनगर) स्थानकावर लाईन-३ ची जोडणी महामेट्रोच्या लाईन-१ (पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) आणि लाईन-२ (वनाज ते रामवाडी) शी केली आहे. महामेट्रो आणि लाईन-३ साठी संयुक्त तिकीट ॲप तयार केले आहे.
पठाण यांनी सांगितले की, या मार्गिकेची रेल्वे डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) तपासणी पूर्ण झाली आहे. माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी या १२.६० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याला २३ जुलै २०२६ रोजी, तर उर्वरित पाच स्थानकांच्या टप्प्याला २३ सप्टेंबर २०२६ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) अंतिम सुरक्षा मान्यता मिळाली. स्थानकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ३५० सुरक्षा रक्षक तैनात आहेत. विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचा पाषाण रॅम्प डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) बालेवाडीत पीएमआर-११ स्थानकाजवळ अमर टेक पार्क परिसरात सुमारे ३० हजार चौरस फूट आणि बाणेरमध्ये पीएमआर-१४ जवळ एबीझेड परिसरात २१ हजार चौरस फूट जागेवर पार्किंग तयार केले आहे.
डॉ. चौधरी यांनी सांगितले की, दररोज सुमारे दोन ते अडीच लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतील, असा त्यांचा अंदाज आहे. सुमारे १०० महिला ट्रेन पायलट गाड्या चालवतील आणि स्थानक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५० टक्के महिला असतील.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.