शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गणेशपेठेत बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी

गणेशपेठेत बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील टेक्सटाईल पार्क येथे म्हाडाच्या निर्माणाधीन इमारतीसाठी वापरली जाणारी सुमारे ४० मीटर उंचीची क्रेन शुक्रवारी सकाळी कोसळली. यात दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन जखमी झाले.

नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील टेक्सटाईल पार्क येथे शुक्रवारी सकाळी बांधकाम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. म्हाडाच्या निर्माणाधीन इमारतीसाठी वापरली जाणारी सुमारे ४० मीटर उंचीची क्रेन अचानक कोसळली. यात दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन कामगार जखमी झाले.

मृत झालेल्या कामगारांची नावे विश्वनाथ कठाणे (४०, रा. गोंदिया) आणि मुकेश निषाद (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) अशी आहेत. मंतुराम (२६, रा. छत्तीसगड) आणि महेश मिस्त्री हे जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी एकच खळबळ उडाली.

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार बांधकामस्थळी कामावर आले होते. सकाळी साधारण १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान बांधकामासाठी वापरली जाणारी ४० मीटर उंच क्रेन उभी करण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी क्रेनचा अचानक तोल गेला आणि ती एका बाजूला झुकत थेट खाली कोसळली.

क्रेन खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडल्यामुळे ही दुर्घटना घडली. सगळे इतके अचानक घडले की कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. या प्रकल्पाचे कंत्राट बी. जे. शिर्के कंपनीला देण्यात आले आहे, तर दुर्घटनेच्या वेळी रामजी प्रजापती हे क्रेन चालवत होते.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या ढिगाऱ्यात २६ वर्षांचे मंतुराम अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष मोहीम राबवली. अग्निशमन अधिकारी सुनील डोकरे, भगवान वाघ, अकलीम शेख, विलास तिळगुळे आणि देवानंद शामकुळे यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केले.

वाहनचालक गणेश राजुरकर आणि कंत्राटी अग्निशमन कर्मचारी नीलेश टेठे यांनी जीवाची पर्वा न करता क्रेनवर चढून अडकलेल्या कामगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेचरच्या मदतीने मंतुराम यांना खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य जखमींनाही उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

दुर्घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकारी अतुल तावले यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. क्रेन कोसळण्यामागे नेमके कोणते तांत्रिक कारण होते, याचा शोध घेतला जात आहे.

तसेच बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या होत्या का आणि सुरक्षा मानकांचे पालन केले जात होते का, याचीही तपासणी सुरू आहे. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळांवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ