सप्टेंबरअखेर बँका सलग 5 दिवस बंद, UFBU चा तीन दिवसांचा संप, SBI कडून ग्राहकांना सतर्कतेचा इशारा
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 28 ते 30 सप्टेंबर 2026 या काळात तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली असून, त्याआधी येणाऱ्या शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे बँकांचे कामकाज सलग पाच दिवस विस्कळीत होऊ शकते.
महिनाअखेरीस बँकेतलं एखादं महत्त्वाचं काम उरकायचं असेल, तर ही बातमी नक्की वाचा. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या संघटनेने 28 ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संपाचा प्रस्ताव मांडला आहे. बँकिंग क्षेत्रातील जवळपास 90 टक्के अधिकारी आणि कर्मचारी या संघटनेशी जोडलेले असल्याचा दावा केला जातो, त्यामुळे या संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो.
संपाच्या काळात बँकांच्या शाखांमधलं प्रत्यक्ष कामकाज ठप्प होण्याची शक्यता गृहीत धरून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना आधीच सावध केलं आहे. बँकेशी संबंधित सगळी महत्त्वाची कामं वेळेत उरकून घ्यावीत, असा स्पष्ट सल्ला SBI ने दिला आहे.
या तीन दिवसांच्या संपाआधी, म्हणजे 26 सप्टेंबरला चौथा शनिवार आणि 27 सप्टेंबरला रविवारची साप्ताहिक सुट्टी येते. याचा अर्थ 26 ते 30 सप्टेंबर असे सलग पाच दिवस ग्राहकांना शाखेत जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे ज्यांना शाखेत जाऊनच काम करायचं आहे, त्यांनी ती सर्व कामं 25 सप्टेंबरच्या आत पूर्ण करावीत असं सांगितलं जात आहे.
SBI ने आपल्या ग्राहकांना याबाबत एसएमएसद्वारेही सूचना पाठवली आहे. त्यात म्हटलं आहे की, काही कर्मचारी संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान तीन दिवसांच्या संपाची हाक दिली असून, ग्राहकांनी आपली महत्त्वाची बँकिंग कामं आधीच पूर्ण करून घ्यावीत. बँकिंग सेवांसाठी एटीएम, एडीडब्ल्यूएम, ग्राहक सेवा केंद्र, योनो, युपीआय किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर करण्याचं आवाहनही या मेसेजमध्ये करण्यात आलं आहे. शाखेतील प्रत्यक्ष कामकाजावर नेमका किती परिणाम होईल, हे कर्मचाऱ्यांच्या संपातील सहभागावर अवलंबून असेल, मात्र सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न बँकेकडून केला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
ज्या कामांसाठी बँक कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष मदत किंवा कागदपत्रं सादर करावी लागतात, त्यांच्यावर या संपाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. रोख रक्कम भरणं, चेकसंबंधीची कामं, केवायसी अपडेट करणं, आवश्यक कागदपत्रं जमा करणं, डिमांड ड्राफ्ट काढणं यांसारखी कामं संपादरम्यान रखडू शकतात किंवा त्यांना उशीर होऊ शकतो. चेक क्लिअरिंगच्या प्रक्रियेतही अडथळे येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे 25 सप्टेंबरपूर्वी शाखेतील प्रलंबित कामं पूर्ण करून घेणं, आवश्यक तेवढी रोख रक्कम आधीच एटीएम किंवा एडीडब्ल्यूएमवरून काढून ठेवणं, खात्यात पुरेशी शिल्लक ठेवून EMI आणि SIP चे ऑटो-डेबिट बाऊन्स होणार नाहीत याची काळजी घेणं, ऑनलाईन व्यवहारांसाठी युपीआय आणि नेट बँकिंगचा वापर करणं आणि केवायसी, चेक प्रोसेसिंग किंवा कागदपत्रांची कामं आधीच उरकणं फायद्याचं ठरेल. एखाद्या बँकिंग कामाची अंतिम तारीख 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान असेल, तर तेही काम वेळेआधी पूर्ण करावं असा सल्ला दिला जात आहे.
प्रस्तावित संपाचा सर्वाधिक परिणाम हा बँकांच्या प्रत्यक्ष शाखांमधील सेवांवरच होणार आहे. त्यामुळे SBI सह सगळ्या बँकांनी ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, योनो मोबाईल ॲप आणि युपीआय यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. या ऑनलाईन सेवांच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करणं, मोबाईल आणि लाईट बिल भरणं यांसारखे रोजचे व्यवहार कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करता येतील.
बँक संपामुळे EMI किंवा क्रेडिट कार्ड बिल भरणं थांबणार नाही. ग्राहक युपीआय, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर करून वेळेत पेमेंट पूर्ण करू शकतात. मात्र EMI, SIP किंवा कोणत्याही ऑटो-डेबिट प्रक्रियेसाठी खात्यात पुरेशी शिल्लक असणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या बिलाची अंतिम तारीख याच संपाच्या काळात येत असेल, तर शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता ते आधीच भरणं योग्य ठरेल.
UFBU ने प्रामुख्याने आठवड्यातून 5 दिवसांची बँकिंग व्यवस्था लागू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करणं, सर्व पेन्शनधारकांसाठी समान महागाई भत्त्याचा फॉर्म्युला लागू करणं आणि एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट होण्याचा पर्याय देणं, अशा विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.