इंदूरच्या तिघा मित्रांचा चाय सुट्टा बार आता ६५० हून अधिक आउटलेट्सचा ब्रँड
सुमारे ३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून २०१६ मध्ये इंदूरमध्ये सुरू झालेल्या चाय सुट्टा बारचे आज सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल असलेल्या ब्रँडमध्ये रूपांतर झाले आहे.
शिक्षण संपलं की नोकरीच्या मागे धावायचं आणि मग आयुष्यभर दुसऱ्यासाठी राबत राहायचं, असा अनेकांचा रस्ता असतो. इंदूरच्या तीन मित्रांनी मात्र हा रस्ता बदलला आणि स्वतःचा व्यवसाय उभा केला. आज त्यांच्या चाय सुट्टा बार या ब्रँडची ६५० हून अधिक आउटलेट्स आहेत.
या कहाणीची सुरुवात अनुभव दुबे आणि आनंद नायक यांच्यापासून होते. हे दोघे मित्र नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होते. नोकरीसाठी तयारी करण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, अशी कल्पना त्यांना सुचली. पुढे त्यांच्यासोबत राहुल पाटीदार सामील झाले. या तिघांनी २०१६ मध्ये इंदूरमध्ये पहिले चाय सुट्टा बार आउटलेट सुरू केले. त्यासाठी त्यांनी अंदाजे ३ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
चहाच्या व्यवसायात येण्यापूर्वी हे तिघे जुने मोबाईल फोन विकायचे. नंतर मोठ्या प्रमाणावर वाढवता येईल असा व्यवसाय एकत्र सुरू करायचा, असं त्यांनी ठरवलं. चहाला त्यांनी व्यवसायाचा पाया बनवलं. चहा आणि खाण्याचे पदार्थ परवडणाऱ्या किमतीत मिळाले, तर लोक आपल्याकडे येतील, या विचाराने त्यांनी काम सुरू केलं. आपल्या ब्रँडला भारतीय संस्कृतीचा स्पर्श द्यायचाही त्यांनी प्रयत्न केला.
चाय सुट्टा बारची सुरुवातीची ओळख कुलहड चहामुळे झाली. पारंपरिक मातीच्या कुलहडमध्ये चहा देण्याची कल्पना ग्राहकांना आवडली. पुढे मेन्यूमध्ये तुळस, आले, चॉकलेट आणि केशर अशा वेगवेगळ्या चहांचा समावेश झाला. चहाशिवाय या आउटलेट्समध्ये पास्ता, बर्गर आणि नूडल्स असे पदार्थही मिळू लागले.
ब्रँडच्या नावात सुट्टा हा शब्द असला, तरी त्यांच्या कॅफेमध्ये धूम्रपानाला परवानगी नाही. खाण्यापिण्याची आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची जागा म्हणून कंपनीने आपली आउटलेट्स वाढवली. हाच वेगळेपणा सगळ्यांना आवडला.
सुरुवातीपासूनच या ब्रँडने परवडणाऱ्या किमतींवर भर दिला. एका कप चहाची किंमत सुमारे १५ रुपये होती, तर कॉफी २० रुपयांपासून सुरू होत होती. कोल्ड कॉफी आणि शेक्सची किंमत ७० रुपये किंवा त्याहून अधिक होती. किमती लोकांच्या खिशाला परवडतील अशा ठेवल्या गेल्या. कमी किमती ठेवूनही मोठा विस्तार करता यावा, म्हणून कंपनीने फ्रँचायझी मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं.
२०१६ मध्ये इंदूरमध्ये सुरू झालेल्या या ब्रँडची आज ६५० हून अधिक आउटलेट्स आहेत. कंपनीने कॅनडामध्ये प्रवेश करून भारताबाहेर पाऊल टाकलं आहे. नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्येही त्यांची आउटलेट्स आहेत. तीन मित्रांची ही कल्पना आता मोठ्या फ्रँचायझी नेटवर्कमध्ये बहरली आहे. सुमारे ३ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून सुरू झालेला चाय सुट्टा बार आज ६५० हून अधिक आउटलेट्स आणि सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल असलेला ब्रँड बनला आहे.