शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

आठ वर्षांनंतर बॉल टेंपरिंगचा मुद्दा पुन्हा तापला, उस्मान ख्वाजाचा मोठा दावा

आठ वर्षांनंतर बॉल टेंपरिंगचा मुद्दा पुन्हा तापला, उस्मान ख्वाजाचा मोठा दावा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजाने आपल्या आगामी पुस्तकात 2018 च्या बॉल टेंपरिंग प्रकरणावर दावे केले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यावर निवेदन दिले आहे.

आठ वर्षांनंतर बॉल टेंपरिंगचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाने 2018 मधील या प्रकरणावर मोठे दावे केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटला हादरा बसला असून सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वात हीच एकमेव चर्चा सुरू आहे.

ख्वाजाच्या आगामी पुस्तकातील काही अंश प्रसिद्ध झाले आहेत. त्यात त्याने 2018 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील काही घटनांवर भाष्य केले आहे. त्याच्या पुस्तकानुसार, त्या दौऱ्यात रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी बॉलशी छेडछाड कशी करायची आणि कोणत्या पद्धती वापरायच्या, याबद्दल संघातील खेळाडूंमध्ये उघडपणे बोलणे होत असे. बॉल खराब करण्यासाठी सँडपेपर वापरण्यासारख्या पद्धतींवरही ऑस्ट्रेलियन संघात उघड चर्चा होत होती, असा खळबळजनक दावा त्याने केला आहे.

एवढेच नाही, तर या गैरप्रकाराची आणि बॉल टेंपरिंगची पूर्ण माहिती फक्त मैदानावरील खेळाडूंनाच नव्हती, तर सपोर्ट स्टाफलाही होती, असा थेट दावा ख्वाजाने आपल्या पुस्तकात केल्याचे समजते.

त्या वेळी ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीज खेळत होता. सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सँडपेपरच्या मदतीने बॉलशी छेडछाड करताना पकडण्यात आले होते. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची जगभर मोठी नाचक्की झाली होती, आणि ती कधीही भरून न निघणारी होती.

या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चौकशी केली. त्या चौकशीत बॉलशी छेडछाड करण्याबद्दल फक्त तीनच खेळाडूंना माहिती असल्याचे समोर आले. हे तीन खेळाडू म्हणजे तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरन बँक्रॉफ्ट. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या तिघांवर बंदी घातली होती.

आता ख्वाजाच्या पुस्तकातील दाव्यांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत निवेदन दिले आहे. आतापर्यंत क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर सादर झालेल्या सर्व माहितीचा अत्यंत योग्य आणि व्यवस्थित विचार करण्यात आला आहे, असे संस्थेने म्हटले आहे. आम्ही निष्कर्षांवर पूर्णपणे समाधानी आहोत, असेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर असून त्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा निर्णय त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच घेतला होता. ऑस्ट्रेलियासाठी तो 88 कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने 6,229 रन्स केल्या आहेत. त्यामध्ये 16 शतके आणि 28 अर्धशतके आहेत. कसोटीशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाकडून 40 वनडे सामने आणि 9 टी 20 इंटरनॅशनल सामनेही खेळले आहेत. 2018 च्या बहुचर्चित बॉल टेंपरिंग प्रकरणावरील त्याच्या या दाव्यांमुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

#नागपूर#खेल#PT24#Sports#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ