मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला निर्णय

ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला निर्णय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज आणि ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका महान खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज आणि ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने वयाच्या ३८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने हा निर्णय अचानक घेतल्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

मॅक्सवेल ऑस्ट्रेलियासाठी एकूण 286 क्रिकेट सामने खेळला. त्याने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या अफाट आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने अगदी कमी वेळात जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मैदानाच्या कोणत्याही भागात मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे होती.

मॅक्सवेल आपल्या स्फोटक आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असे. त्याच्या याच फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. फक्त फलंदाजीच नाही, तर फिरकी गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण यातही त्याने स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. आपली फिरकी गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण यांच्या बळावरही त्याने संघाला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्याची उणीव कायमच भासणार आहे.

वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध दुखापत झालेली असताना त्याने केलेली खेळी त्याच्या कारकीर्दीतली सर्वात महत्त्वाची खेळी ठरली होती. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातली ही खेळी कधीही विसरता येणार नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या एका अतिशय कठीण सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला होता. तेव्हा स्नायूंच्या वेदना सहन करत मॅक्सवेलने नाबाद 201 धावांची खेळी केली. वनडे क्रिकेटमधली हीच त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. मॅन ऑफ दी मॅच ठरलेली ही खेळी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवली गेली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी मॅक्सवेल ETPL या लीगमध्ये खेळताना दिसला होता. पुढच्या काळात तो कोणत्या लीगमध्ये खेळताना दिसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मॅक्सवेलने अचानक निवृत्ती जाहीर केल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघालाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, संपूर्ण क्रिकेटविश्वातून मॅक्सवेलला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

#नागपूर#खेल#PT24#Sports#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ