आयफोन वारंवार हँग होतो? फोर्स रिस्टार्टसह घरच्या घरी करता येणारे उपाय
आयफोन हँग झाला, ॲप्स चालत नाहीत आणि फोन बंदही होत नाही, तर प्रत्येक वेळी मोठा बिघाड असतोच असे नाही. कारणे समजून घेतली आणि काही सोपे उपाय केले, तर सर्व्हिस सेंटरला न जाता प्रश्न सुटू शकतो.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महागडा आयफोन घेतला आणि तोच अचानक हँग झाला, की चिडचिड होणारच. ॲप्स उघडत नाहीत, फोन बंद करता येत नाही आणि सिस्टिम काही वेळ अडकून बसते. अशा वेळी काय करावे हेच सुचत नाही आणि फोन खराब झाला असे वाटू लागते.
पण फोन हँग होण्यामागे प्रत्येक वेळी मोठी समस्या असतेच असे नाही. लो बॅटरी, भरलेले स्टोरेज किंवा इतर किरकोळ कारणांमुळेही आयफोन अडकू शकतो. विशेष म्हणजे ही अडचण सोडवण्यासाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स घरबसल्या करूनही प्रश्न मार्गी लागू शकतो.
आधी कारणे पाहू. आयफोनच्या बॅकग्राऊंडमध्ये एकाच वेळी अनेक कामे सुरू असतील, तर फोनवरचा भार वाढतो आणि तो हँग होऊ शकतो. तसेच एकाच वेळी अनेक ॲप्स वापरले, तरी सिस्टिमवर ताण येतो आणि डिव्हाईस अडकू शकते. बॅटरी कमी असली, तरी त्याचा परिणाम फोनच्या स्पीडवर होतो.
स्टोरेज फुल झाले असेल तर तेही हँगचे कारण ठरू शकते. स्टोरेज भरलेले असेल, तर सिस्टिमला महत्त्वाची कामे करण्यासाठी, अपडेट इंस्टॉल करण्यासाठी आणि तात्पुरत्या फाइल्स सेव्ह करण्यासाठी जागाच उरत नाही. अशा वेळी फोन फ्रीज होऊ शकतो.
एखादा विशिष्ट ॲप वापरतानाच फोन वारंवार हँग होत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. काही ॲप्स आयओएस वर्जनसोबत पूर्णपणे सुसंगत नसतात आणि त्यांच्यातील बगमुळे फोन फ्रीज होऊ शकतो. असा ॲप अपडेट करणे किंवा गरज नसेल तर फोनमधून डिलीट करणे योग्य ठरते.
आता फोन प्रत्यक्ष हँग झाला तर काय करायचे ते पाहू. आयफोन हँग किंवा फ्रीज झाला असेल, तर फोर्स रिस्टार्ट हा पर्याय वापरता येतो. स्क्रीनवर टच केल्याचा काहीच परिणाम होत नसेल आणि फोन नेहमीच्या पद्धतीने बंद होत नसेल, तेव्हा फोर्स रिस्टार्ट करता येतो.
त्यासाठी सर्वात आधी व्हॉल्यूम अप बटन दाबून लगेच सोडा. त्यानंतर व्हॉल्यूम डाऊन बटन दाबून तेही लगेच सोडा. मग साईड बटन दाबून धरा. स्क्रीनवर एप्पल लोगो दिसू लागला की साईड बटन सोडा. यानंतर आयफोन पुन्हा सुरू होण्यास थोडा वेळ लागू शकतो.
आयओएस अपडेट करणे हाही एक महत्त्वाचा उपाय आहे. जुन्या आयओएसमुळे फोनमध्ये फ्रीज आणि क्रॅश होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. ॲपलच्या सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये फक्त नवीन फीचर्सच नसतात, तर फोनच्या कामगिरीवर परिणाम करणाऱ्या त्रुटींच्या (बग्जच्या) सुधारणाही असतात. याशिवाय हे अपडेट्स ॲप सुसंगतता आणि बॅटरी व्यवस्थापनातही सुधारणा करतात.