गोकुळ अध्यक्षपदाचा वाद दिल्लीत: राहुल गांधींच्या आरोपांना बावनकुळेंचे उत्तर
गोकुळमध्ये 4 शासननियुक्त संचालक नेमल्यावरून राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले, तर रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली.
कोल्हापुरातील गोकुळच्या निवडणुकीत 13 संचालक निवडून आले. तरीही अध्यक्षपदाचा मान सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला मिळालेला नाही. त्यामुळे अध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सरकारने गोकुळमध्ये 4 शासननियुक्त संचालकांची नेमणूक केली आहे.
गोकुळमधील सरकारी हस्तक्षेपाचा हा वाद आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधी यांचा आरोप असा की, गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपला पराभूत केले. त्यानंतर भाजपने निवडणुकीचे नियमच बदलले आणि 4 शासननियुक्त संचालक घुसवले. 12 संचालकांची संख्या 16 करून बहुमताची कथित चोरी केली, ही दूध उत्पादकांची चोरी आहे, असे ते म्हणाले. भाजपने लोकांकडून मिळालेल्या जनादेशात भेसळ केली आहे, असेही त्यांनी म्हटले. भाजप इतकी निराश का झाली आहे, असा सवाल करून त्यांनी सत्ता वाचवण्यासाठी हे लोक कोणत्याही पातळीवर जात आहेत, अशी टीका केली. दूध उत्पादकांनी मत चोरणाऱ्यांना लक्षात ठेवावे, शेतकरी विसरत नाही, असेही ते म्हणाले.
कोल्हापूरमधील अध्यक्ष निवडीच्या वादावर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, 'गोकुळचा निर्णय आणि मागणीवर सहकार मंत्री, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारचे पूरक कार्य, गोकुळला केलेली मदत, राज्य सरकारकडून होणारे सहकार्य याकरिता सरकार आणि निवडून आलेली समिती यांचा समन्वय करण्यासाठी निर्णय घेतला असेल.'
नागपुरातील भाजपच्या लोकशाही बचाव यात्रेबाबतही बावनकुळे बोलले. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ही रॅली आयोजित केली आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हजारो नागरिक रॅलीत येणार आहेत. राहुल गांधींना एक ठोस प्रत्युत्तर दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'गोकुळच्या निवडणुकीत साडेपाच लाख सभासदांनी दिलेले जनमत बाजूला सारून शासकीय सदस्य नेमत गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असेच म्हणावे लागेल. निकालाच्या दिवशी कोल्हापुरात राहून मिरवणूक काढता आली नाही म्हणून ईगो दुखावला असेल, तर मग काय शासकीय सदस्य नेमून लोकमताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार का? सरकारचा हा निर्णय म्हणजे अराजकता आहे.'
पवार पुढे म्हणाले, 'गोकुळचा विषय केवळ बंटी पाटील आणि कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, तर लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. आज गोकुळमध्ये रडीचा डाव केला, उद्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर रडीचा डाव खेळतील. त्यामुळे हे असले विषारी साप आताच ठेचले पाहिजेत. ज्या दिवशी अध्यक्ष निवड असेल, त्या दिवशी सर्व लोकशाही प्रेमी, संविधान प्रेमी नागरिकांनी गोकुळला घेराव घालून जनमताची ताकद मुंबईपासून दिल्लीपर्यंत दाखवून द्यायला हवी. गोकुळचे सभासद आणि बंटी पाटलांसोबत संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.'
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.