गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची एन्ट्री, सतेज पाटलांना फोन करून दिला पाठिंबा

गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची एन्ट्री, सतेज पाटलांना फोन करून दिला पाठिंबा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना फोन करून पाठिंबा जाहीर केला आहे. गोकुळ दूध संघातील चार संचालकांच्या नियुक्तीवरून वाद सुरू आहे.

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा सत्तासंघर्ष आता आणखी रंगात आला आहे. चार संचालकांच्या नियुक्तीवरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात आधीच जोरदार खडाजंगी सुरू आहे. अशा वेळी या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही एन्ट्री झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना थेट फोन करून आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

गोकुळ दूध संघातील या सत्तासंघर्षात सतेज पाटील यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकीत मिळालेला जनादेश डावलून शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्तेचं गणित बदलण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. "लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत," असा विश्वास ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे ही लढाई आता केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता तिला राज्यव्यापी राजकीय स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एकूण २५ जागा होत्या. त्यापैकी १३ जागांवर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने विजय मिळवला, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. मात्र अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत बहुमत आणि कोरम यांचा प्रश्न निर्माण झाला.

त्यानंतर राज्य सरकारने चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय म्हणजे निवडणुकीत मिळालेला कौल बदलण्याचा प्रयत्न आहे.

या प्रकरणात आता न्यायालयातही लढाई सुरू झाली आहे. दुसरीकडे, सतेज पाटील यांनी ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या निर्णयावरून शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे गोकुळच्या मुद्द्यावर महायुतीमध्येही मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना दिलेला पाठिंबा या संघर्षाला किती बळ देणार आणि सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ