गोकुळमधील संचालक नेमणुकीवरून राज ठाकरे यांचा भाजपला सवाल, लोकशाहीच्या भूमिकेवर बोट
गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात उतरत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रातील गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.
भाजपच्या लोकशाहीविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाच्या दुटप्पी धोरणावर बोट ठेवले आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी भाजपला "अजब पक्ष" असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, भाजप खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे, तरीही तो "लोकशाही वाचवा" म्हणून मोर्चे काढत आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो, हे जगातील एकमेव उदाहरण असेल, असा टोला त्यांनी लगावला.
गोकुळच्या निवडणुकीचा संदर्भ देत ठाकरे यांनी भाजपला थेट सवाल केला आहे. त्यांच्या पोस्टनुसार, भाजप पॅनलचे १२ जण आणि सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आले. त्यानंतर लगेच सरकारचे, म्हणजे भाजपचेच, ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय, असे ठाकरे यांनी विचारले आहे. निवडून आलेले संचालक मात्र बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून आले, असेही त्यांनी नमूद केले.
लोकशाहीची खरोखर पर्वा किंवा काळजी वाटत असती, तर असला प्रकार भाजपने केला नसता, असे राज ठाकरे म्हणतात. गोकुळवर सत्ता मिळवता आली नाही म्हणून भाजप आपली सगळी तत्त्वे बाजूला ठेवतो आणि वर लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतो, अशी टीका त्यांनी केली आहे.
सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ, हे दोन्ही एकाच वेळी कसे यावेत, याचेच आश्चर्य वाटते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
पुढे ठाकरे यांनी भाजपच्या भविष्यातील वागण्याबद्दल आपले मत मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सत्तेत असताना हे लोक लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले आणि कायदा सुव्यवस्था बिघडली, म्हणून ते दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील, असे ते म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे, म्हणून अर्थव्यवस्था वाचवा यासाठीही मोर्चे निघतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेवटी राज ठाकरे यांनी भाजपला सल्ला दिला आहे. भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असे ते म्हणतात. कुठल्याही मार्गाने भाजपने जे बहुमत मिळवले, ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केले. आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे झुकायला लागली आहे, तर भाजपनेही ते सहन करायला शिकले पाहिजे, असे ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.