शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

लाखांदूरच्या दोनाडमध्ये दिवाळीच्या दिवशी वाघाने घेतला पाच वर्षांच्या मोक्षचा जीव

लाखांदूरच्या दोनाडमध्ये दिवाळीच्या दिवशी वाघाने घेतला पाच वर्षांच्या मोक्षचा जीव छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातल्या दोनाड गावात शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या मोक्ष बुरडेवर वाघाने झडप घातली. दिवाळीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात दिवाळीचा सण सुरू असतानाच एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. दोनाड गावात वाघाने केलेल्या हल्ल्यात मोक्ष बुरडे या पाच वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेला. आई-वडील जवळच असताना वाघाने मोक्षला उचलले आणि सुमारे २०० मीटर फरफटत नेले. यामुळे सगळे गाव हळहळले आहे.

गुरुवारी, ५ नोव्हेंबरला दोनाडचे शेतकरी सचिन दयाराम बुरडे (४५) आणि त्यांच्या पत्नी सोनाली शेतात गेले होते. पावसाळी धानाची कापणी झाली होती आणि धानाचे भारे बांधून त्यांची रास लावण्याचे काम सुरू होते. दिवाळीमुळे शाळेला सुट्टी होती. म्हणून दुपारी तीनच्या सुमारास त्यांची दहा वर्षांची मुलगी नक्षत्र आणि मुलगा मोक्ष आई-वडिलांना भेटायला शेतात आले.

शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच क्षणी मोक्षवर झडप घातली. काय होतंय हे कळायच्या आतच त्याने मोक्षला जबड्यात धरून ओढत नेले. मुलाला वाचवायला आई-वडिलांना एक क्षणही मिळाला नाही.

मुलावर हल्ला होताना दिसताच सचिन यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. आवाज ऐकून आसपासच्या शेतांतले शेतकरी धावत आले. तोपर्यंत वाघाने मोक्षला गंभीर जखमी केले होते. थोड्या अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. वाघाने मानेला पकडल्यामुळे त्याला जबर इजा झाली होती. ज्या दिवशी घरोघरी दिवे आणि पणत्या लागायच्या, त्याच दिवशी बुरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेची खबर मिळताच लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी आले. पोलीस पाटील भारती रामलाल नागोसे आणि सरपंच शिवदास बुरडे यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या घटनेनंतर दोनाड आणि आजूबाजूच्या गावांत भीतीचे वातावरण आहे. शेतात काम करताना शेतकरी आणि त्यांच्या घरच्यांच्या जिवाला धोका वाटतो आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. गावकऱ्यांची मागणी आहे की वाघाचा लगेच बंदोबस्त करावा, लोकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय करावेत आणि सरकारने बुरडे कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ