सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

प्रातास बेटांजवळ चिनी तटरक्षक जहाजांच्या हालचाली, चीन-तैवानमध्ये तणाव पुन्हा वाढला

प्रातास बेटांजवळ चिनी तटरक्षक जहाजांच्या हालचाली, चीन-तैवानमध्ये तणाव पुन्हा वाढला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दक्षिण चीन समुद्रातील प्रातास बेटांजवळ चिनी तटरक्षक दलाच्या जहाजांनी केलेल्या हालचालींमुळे चीन आणि तैवान यांच्यातला तणाव पुन्हा वाढला आहे. चीनने या भागावर आपले सार्वभौमत्व असल्याचा दावा केला आहे. तैवानने मात्र चीनच्या या कारवायांना चिथावणीखोर म्हटले आहे. २१ ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या घडामोडींमुळे या समुद्री भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

तैवानच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, चिनी तटरक्षक दलाची जहाजे प्रातास बेटांजवळच्या प्रतिबंधित सागरी क्षेत्रात शिरली. त्यानंतर तैवानने आपले तायचुंग हे गस्ती जहाज घटनास्थळी पाठवले. दोन्ही बाजूंनी रेडिओ संदेशाद्वारे एकमेकांना इशारे दिले गेले. या भागातली गस्त कायदेशीर आहे, असे चीनने सांगितले आहे. तैवानने मात्र चीनच्या या पवित्र्याला विरोध केला असून, या सागरी भागाशी चीनचा काडीचाही संबंध नाही, असे म्हटले आहे. दोन्ही जहाजे एकमेकांच्या अगदी जवळ जाऊन संघर्ष करताना दिसली.

याआधी, १८ ऑक्टोबर रोजी तैवानच्या तटरक्षक दलाने चीनची १६ जहाजे मागे हटवल्याचा दावा केला आहे. यात तटरक्षक दलाची जहाजे, संशोधन जहाजे आणि मासेमारी नौका यांचा समावेश होता. या जहाजांच्या सारख्या हालचालींना तैवानने मेरीटाईम हॅरॅसमेंट, म्हणजेच सागरी छळाची कारवाई, असे म्हटले आहे.

चीन आणि तैवानमधला वाद फक्त या दोन देशांपुरता मर्यादित नाही. या भागातले सागरी मार्ग, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळी यांच्यासाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेला पाठिंबा दिला असल्याने या संघर्षात अमेरिकेची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे.

चीन तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो. तैवान सरकारने मात्र चीनचा हा दावा फेटाळला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंमधला संघर्ष बराच काळ सुरू आहे. सध्याच्या घडामोडींमुळे तणाव पुन्हा वाढला असला, तरी लगेच युद्ध सुरू होण्याचे कोणतेही संकेत अजून तरी मिळालेले नाहीत.

इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धात अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकी लष्करी ठिकाणांवर इराणने हल्ले केल्याने अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच गेल्या काही दिवसांत अमेरिकेने चीनजवळचे आपले सैन्य पहिल्या लाईनवरून तिसऱ्या लाईनवर मागे घेतले होते. आज ना उद्या चीन तैवानवर हल्ला करेल, अशी भीती आंतरराष्ट्रीय राजकारणात व्यक्त केली जात असतानाच, चीन आणि तैवान यांच्यातला वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ