चीनजवळचे सैन्य दूर हलवा, अमेरिकेला Defense Priorities थिंक टँकच्या अहवालात शिफारस
फर्स्ट आयलंड चेनमधील उपस्थिती कमी करून सैन्य सेकंड आयलंड चेनकडे न्यावे, असे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेने मात्र अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
अमेरिका आणि चीन यांच्यातली सामरिक स्पर्धा वाढत असताना, अमेरिकेच्या आशियातील सैन्य तैनातीबद्दल एक नवा अहवाल चर्चेत आला आहे. अमेरिकेतील Defense Priorities या थिंक टँकने हा अहवाल तयार केला आहे. अमेरिकेने चीनच्या जवळ असलेल्या फर्स्ट आयलंड चेनमधली लष्करी उपस्थिती कमी करावी आणि सैन्य अधिक दूरच्या सेकंड आयलंड चेनकडे हलवावे, अशी शिफारस त्यात केली आहे.
यामागचे कारणही अहवालात दिले आहे. फर्स्ट आयलंड चेनवर सहज मारा करता येईल अशी मिसाईल्स चीनकडे मोठ्या संख्येने आहेत. उलट सेकंड आयलंड चेनवर अमेरिकन सैन्य गेले, तर तिथे हल्ला करण्यासाठी लागणारी मिसाईल्स चीनकडे फारशी नाहीत. म्हणजेच तैवान किंवा जपान यांच्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष झाला, तर चीनच्या जवळ राहून लढणे अमेरिकेला अजिबात परवडणारे नाही, असे थिंक टँकचे म्हणणे आहे.
अहवालानुसार जपान, दक्षिण कोरिया आणि फिलिपिन्सच्या आसपासची अमेरिकेची लष्करी उपस्थिती टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा विचार मांडला आहे. त्याऐवजी गुआम, नॉर्दन मारियाना आयलँड्स, पलाऊ, मायक्रोनेशिया आणि मार्शल आयलँड्स यांसारख्या, चीनपासून तुलनेने दूर असलेल्या भागांत अमेरिकेचे सैन्य आणि लष्करी साधने केंद्रित करण्याचा प्रस्ताव आहे.
या बदलांना वेळापत्रकही दिले आहे. बहुतांश बदल २०३० पर्यंत पूर्ण करावेत आणि उरलेले २०३५ पर्यंत पूर्ण करावेत, अशी शिफारस अहवालात आहे. विशेषतः जपानमधील अमेरिकन सैन्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याची कल्पना त्यात आहे. मोठ्या लष्करी तळांऐवजी अधिक सुरक्षित ठिकाणी हवाई दल, नौदल, पाणबुड्या, ड्रोन आणि गुप्तचर यंत्रणांची क्षमता ठेवावी, असाही प्रस्ताव आहे.
तैवान आणि जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली आहे. त्याबाबतचे कागदोपत्री करार रद्द करण्याची वेळ आता आली आहे, असे अहवालात म्हटले आहे. तैवान आणि जपानला वाचवण्याच्या प्रयत्नात चीन आणि नॉर्थ कोरियाची मिसाईल्स अमेरिकेच्या जमिनीपर्यंत येऊ शकतात, ही भीतीही त्यात व्यक्त केली आहे.
जागतिक राजकारणाचे जाणकार सांगतात की, चीन तैवानला आपला भूभाग म्हणून कधीही घोषित करू शकतो. तसे झाले तर अमेरिका चीनशी लढाई करेल हे चित्र विरळ झाले आहे. त्यामुळे तैवान आणि जपान आता अमेरिकेच्या नाही, तर देव भरोसे राहणार, असे हे जाणकार म्हणतात. चीनची वाढलेली ताकदच अमेरिकेला मागे वळायला भाग पाडत आहे, असेही यातून दिसते, असे त्यांचे मत आहे.
या प्रस्तावामुळे अमेरिका प्रत्यक्षात आशियातून माघार घेणार, असा अर्थ मात्र सध्या तरी होत नाही. ऑगस्ट २०२६ मध्ये अमेरिकेच्या संरक्षण धोरणातील वरिष्ठ अधिकारी एल्ब्रिज कोल्बी यांनी अमेरिका इंडो-पॅसिफिकमधून माघार घेत नसल्याचे स्पष्ट केले होते. चीनच्या जवळच्या फर्स्ट आयलंड चेनवरील अमेरिकेचे धोरणात्मक लक्ष कायम आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे समोर आलेला अहवाल हा धोरणात्मक चर्चेतला अहवाल आहे. अमेरिकेने चीनच्या जवळचे सैन्य मागे घेण्याचा अंतिम निर्णय घेतला, हे त्यातून सिद्ध होत नाही.
हा अहवाल साधासुधा नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारधारेचे कट्टर समर्थक असलेल्या Dan Caldwell आणि Jennifer Kavanagh यांनी तो लिहिला आहे. त्यामुळे त्याला हलक्यात घेता कामा नये, असे अमेरिकेत बऱ्याच जणांचे मत आहे.