नावी पिल्लई यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार, ट्रम्प यांना पुन्हा हुलकावणी
दक्षिण आफ्रिकेच्या ज्येष्ठ न्यायमूर्ती आणि मानवाधिकार तज्ज्ञ नवनेथम 'नावी' पिल्लई यांना नॉर्वेजियन नोबेल समितीने यंदाचा शांतता पुरस्कार जाहीर केला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
यंदाचा, म्हणजे 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या ज्येष्ठ न्यायमूर्ती आणि मानवाधिकार तज्ज्ञ नवनेथम 'नावी' पिल्लई यांना जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने ही घोषणा केली. शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला चालना देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा सन्मान दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय कायदे बळकट करणे, मानवाधिकारांचे रक्षण करणे आणि जगभरात हिंसाचाराला आळा घालून शांतता प्रस्थापित करणे, या कामातल्या योगदानाचा उल्लेख या घोषणेत आहे.
नावी पिल्लई यांचे वय 85 वर्षे आहे. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1941 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डरबन शहरात झाला. त्यांचे कुटुंब सुमारे 136 वर्षांपूर्वी, म्हणजे एकोणिसाव्या शतकात, भारतातून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. त्या भारतीय तमिळ वंशाच्या आहेत.
पिल्लई वर्णद्वेषी (Apartheid) राजवटीच्या अतिशय कठीण काळात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी कायद्याचे शिक्षण दक्षिण आफ्रिकेतच घेतले. 1967 मध्ये त्यांनी आपल्या गावी, नेटाल इथे वकिली सुरू केली आणि तिथे असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला वकील ठरल्या. वर्णद्वेषी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नेल्सन मंडेला यांच्यासारख्या अनेक राजकीय आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या बचावासाठी त्यांनी कायदेशीर लढा दिला.
दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष संपल्यानंतर 1995 मध्ये त्यांची उच्च न्यायालयात कार्यवाहक न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. त्याच वर्षी संयुक्त राष्ट्र महासभेने त्यांची रवांडा नरसंहाराशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खटला न्यायाधिकरणावर (ICTR) न्यायाधीश म्हणून निवड केली. पुढे 1 सप्टेंबर 2008 ते 2014 पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार उच्चायुक्त (UN High Commissioner for Human Rights) म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. जगातील अनेक देशांमधल्या अत्याचारांना आणि हिंसाचाराला राष्ट्रीय नेत्यांना जबाबदार धरत त्यांनी मानवाधिकारांसाठी ठामपणे लढा दिला.
नोबेल समितीने आपल्या घोषणेत म्हटले आहे, "सध्याच्या जागतिक परिस्थितीत जेव्हा कायदेसंस्थेवर हल्ले होत आहेत, तेव्हा नावी पिल्लईंसारख्या साहसी, दूरदर्शी आणि न्यायप्रिय व्यक्तींचे योगदान संपूर्ण मानवतेसाठी आशेचा किरण आहे."
या घोषणेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा निराशा पत्करावी लागली आहे. गेल्या काही काळापासून आपण अनेक युद्धे थांबवली आहेत, असा दावा करत ट्रम्प यांनी आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, अशी सातत्याने मागणी केली होती. मात्र नोबेल समितीने त्या दाव्यांना बगल देत नावी पिल्लई यांच्या मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय न्याय क्षेत्रातील कामाची दखल घेतली.