रियाधला जाणारी-येणारी एअर इंडियाची विमाने 10 ऑक्टोबरपर्यंत बंद, सौदीत हुथींचे हल्ले
येमेनमधील हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. त्यानंतर एअर इंडियाने रियाधची सर्व उड्डाणे 10 ऑक्टोबरपर्यंत रद्द केली असून भारतीय दूतावासाने नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोर सौदी अरेबियातील अनेक महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोनने सतत हल्ले करत आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या लष्करी तणावात सौदीतल्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. याचा थेट परिणाम विमानसेवेवर झाला असून एअर इंडियाने रियाधला जाणारी आणि तिथून भारतात येणारी सर्व उड्डाणे 10 ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेला सगळ्यात आधी प्राधान्य द्यायचे म्हणून हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने सांगितले. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच उड्डाणे पुन्हा सुरू केली जातील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. उड्डाणे अचानक रद्द झाल्यामुळे अनेक भारतीय प्रवासी विमानतळावर आणि शहरात अडकले आहेत. त्यांना दूतावासाकडून मदत दिली जात आहे.
रियाधमधील भारतीय दूतावासाने तिथे राहणाऱ्या लाखो भारतीयांसाठी तातडीची सूचना (Advisory) काढली आहे. सगळ्यांनी खूप सावध राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये आणि गरज पडली तर सुरक्षित ठिकाणी किंवा घरातच थांबावे, असे दूतावासाने सांगितले. सौदी प्रशासन अधिकृत माध्यमांतून जे सुरक्षा निर्देश देत आहे, त्यांचे काटेकोर पालन करावे, असेही दूतावासाने म्हटले आहे.
सध्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांशी किंवा सुरक्षा परिस्थितीशी संबंधित कोणतेही व्हिडिओ, फोटो किंवा पडताळणी न झालेल्या बातम्या सोशल मीडियावर शेअर किंवा रिपोस्ट करू नयेत, असे आवाहन दूतावासाने केले आहे. त्यामुळे अफवा पसरू शकतात आणि स्थानिक कायद्यांनुसार कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. सौदीतल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले.
हुथी बंडखोरांनी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाला (King Khalid International Airport) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. याआधीही त्यांनी रियाध आणि दक्षिणेकडील आभा (Abha) आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हल्ले केले होते. या ताज्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्यांनी आपल्या सेवा तात्पुरत्या थांबवल्या आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आभा आणि रियाधमधील विमानतळांवर झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा अतिशय कडक शब्दांत निषेध केला आहे. विमानतळांसारख्या अत्यावश्यक नागरी पायाभूत सुविधांना (Civilian Infrastructure) आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही, असे मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्यांत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांबद्दल भारताने तीव्र दुःख व्यक्त केले असून जखमींना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा दिली आहे. या कठीण काळात भारत सौदी अरेबियाचे सरकार आणि तेथील जनतेच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे, असेही मंत्रालयाने नमूद केले.
हुथींनी फक्त रियाध आणि आभाच नाही, तर सौदीतील इतर अनेक प्रमुख शहरांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. खमिस मुशायत (Khamis Mushayt), ताइफ (Taif) आणि आसपासच्या भागात क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोन फिरत असल्याच्या आणि लोकवस्तीजवळ कोसळल्याच्या बातम्या आल्या आहेत. सौदीच्या अधिकृत सूत्रांनुसार अलीकडच्या हल्ल्यांत तिघांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या हल्ल्यांना उत्तर म्हणून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने (Saudi-led Coalition) येमेनमधील हुथींच्या लष्करी तळांवर आणि क्षेपणास्त्र लाँचर्सवर जोरदार हवाई हल्ले (Airstrikes) केले आहेत. दोन्ही बाजूंच्या या संघर्षामुळे आखाती क्षेत्रात युद्धासारखा तणाव निर्माण झाला आहे.