गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

कर्जमाफीचे पैसे जमा होऊनही खाती सुरूच, चिखलीतील शेतकरी नव्या पीककर्जाविना; दोन दिवसांत प्रश्न न सुटल्यास

कर्जमाफीचे पैसे जमा होऊनही खाती सुरूच, चिखलीतील शेतकरी नव्या पीककर्जाविना; दोन दिवसांत प्रश्न न सुटल्यास छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
व्यवसाय PT24 टीम

शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतरही चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांची जुनी कर्जखाती बंद झालेली नाहीत. शेतकरी संघटनेने दोन दिवसांचा इशारा दिला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळत नसल्याने त्यांच्यात संताप आहे. कर्जमाफीचे पैसे शासनाकडून खात्यावर जमा झालेले असतानाही बँकांची दिरंगाई आणि आडमुठे धोरण यामुळे शेतकऱ्यांची जुनी कर्जखाती अजून बंद झालेली नाहीत. त्यामुळे पात्र असलेले शेतकरी नव्या पीककर्जापासून वंचित राहिले आहेत.

या गंभीर प्रश्नावर संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेलगाव जहागीर, चंदनपूर आणि भोरसा-भोरसी येथील शेतकऱ्यांचा हा प्रश्न येत्या दोन दिवसांत मार्गी लागला नाही, तर बँकेत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह संघटनेने दिला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चिखली शाखेत शेलगाव जहागीर येथील शेतकऱ्यांची खाती आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एकलारा शाखेत चंदनपूर आणि भोरसा-भोरसी येथील शेतकऱ्यांची खाती आहेत. या दोन्ही ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम शासनाकडून गेल्या ऑगस्ट महिन्यातच जमा करण्यात आली आहे.

नियमांनुसार बँकांनी कर्जखाती बंद करण्यासाठी लागणारी यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवायची होती. तसेच हेअरकटनुसार बँकांनी भरायची व्याजाची आणि तफावतीची उर्वरित रक्कम जमा करणे अपेक्षित होते. मात्र दीड ते दोन महिने उलटून गेले तरी बँकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या तांत्रिक दिरंगाईमुळे शेतकऱ्यांची कर्जखाती अजूनही कागदोपत्री सुरूच आहेत. खरीप हंगाम हातातून गेला आणि आता रब्बी हंगामासाठीही नवीन पीककर्ज मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

या समस्येवर बोलताना शेतकरी नेते सरनाईक यांनी शासन आणि बँक प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. हेअरकटनुसार उर्वरित रक्कम भरण्याची मुख्य जबाबदारी बँकांची आहे आणि शासन व बँकांमध्ये करारही झालेला आहे, तरीही बँका टाळाटाळ का करत आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने या मनमानी कारभाराला तत्काळ आळा घातला नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि त्यांना आलेला खर्च यांची भरपाई संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच वसूल करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, सरपंच अरुण सरनाईक, उपसरपंच शिवशंकर ठेंग, श्रावण बडगे, गजानन टेंग, पंजाबराव आटोळे, समाधान पंडागळे, परमेश्वर साळवे, औचितराव चव्हाण, अनिल परिहार, राजेश आंभोरे, संजय पंडागळे आणि अजाबराव बडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#नागपूर#कारोबार#PT24#Business#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ