'फेसबुक किंग' बंटी दीक्षितचा भररस्त्यात खून; जिमवरून परतताना रील्समधील मित्रानेच कारने उडवले
छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-७ परिसरात गुरुवारी भरदिवसा 'फेसबुक किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंटी दीक्षितचा त्याच्या मित्रानेच खून केला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-७ परिसर गुरुवारी एका थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या हत्येने हादरून गेला. सोशल मीडियावर 'फेसबुक किंग' म्हणून ओळखला जाणारा आणि इन्स्टाग्रामवरही खूप लोकप्रिय असलेला देवेश चंद्रेश दीक्षित उर्फ बंटी दीक्षित (वय ३५) याचा भरदिवसा, वर्दळीच्या रस्त्यावर निर्घृण खून करण्यात आला.
बंटी ज्या मित्रासोबत सोशल मीडियावर रील्स बनवायचा, त्याच पवन पराशर याने हा खळबळजनक घात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बंटी नेहमीप्रमाणे जिम संपवून आपल्या दुचाकीने घरी निघाला होता. त्याच वेळी त्याचा जुना मित्र पवन पराशर त्याचा पाठलाग करत होता.
वाटेत एका पानटपरीवर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर बंटी आपल्या दुचाकीवरून पुढे निघून गेला. पण रागाच्या भरात असलेल्या पवनने बजरंग चौकात, गर्दीच्या ठिकाणी, आपल्या कारने बंटीच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली.
धडकेमुळे बंटी रस्त्यावर कोसळला. त्यानंतर पवनने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या रक्तरंजित घटनेत गंभीर दुखापत झाल्यामुळे बंटीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर दीक्षित कुटुंबाबद्दल एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि रहस्यमय गोष्ट पुढे आली आहे. सिडको परिसरात राहणाऱ्या या कुटुंबावर गेल्या सहा वर्षांपासून एकापाठोपाठ एक मृत्यूचे सावट पसरले आहे. २०२० मध्ये बंटीच्या आईचे अचानक निधन झाले. त्यानंतर २०२२ मध्ये, आईच्या विरहातून सावरण्याआधीच वडिलांचे निधन झाले.
२०२४ मध्ये, वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन वर्षांत बंटीच्या भावाचा मृत्यू झाला. आणि आता २०२६ मध्ये, बरोबर दोन वर्षांनी, गुरुवारी बंटीचा त्याच्याच मित्राने खून केला. दर दोन वर्षांनी कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू होत असल्याने, या कुटुंबामागे नक्की कोणती दुर्दैवी मालिका सुरू आहे, अशी हळहळ संपूर्ण शहरातून व्यक्त होत आहे.
आपल्या हटके रील्समधून लाखो चाहत्यांचे मनोरंजन करणारा बंटी असा अचानक सोडून गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या हत्येनंतर आता या दुर्दैवी कुटुंबात केवळ बंटीची पत्नी, त्याची लहान मुलगी, भाऊ आणि भावजय एवढेच सदस्य उरले आहेत.
सलग घडून आलेल्या या मृत्यूंमुळे संपूर्ण सिडको एन-७ परिसरात प्रचंड घबराट आणि शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. बंटीच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपला असून, त्याच्या पत्नीवर आणि लहान मुलीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.