छत्रपती संभाजीनगरमधील जेएसडब्ल्यू ग्रीनटेकचा प्रकल्प बस आणि ट्रक उत्पादनासाठी सज्ज
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जेएसडब्ल्यू ग्रीनटेकच्या नव्या व्यावसायिक बस आणि ट्रक निर्मिती प्रकल्पाला भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रकल्पातील उत्पादन विभागाची पाहणी केली आणि तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला.
प्रकल्पातील यंत्रसामग्री बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उत्पादनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि कर्मचारी तयार आहेत. आता उत्पादन सुरू करण्याची तयारी करा, अशा सूचना जिंदाल यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.
छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीत जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाची बांधणी पूर्ण झाली आहे. शहराच्या विकासात या प्रकल्पाचा वाटा मोठा असणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याने या प्रकल्पाकडून तरुणाईला आशा आहे. जिंदाल यांनी प्रकल्पाला भेट देऊन अधिक माहिती घेतली आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू व्हावे, यावर त्यांचा भर होता.
जानेवारीपर्यंत बस आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे उत्पादन प्रकल्पाच्या निर्धारित क्षमतेनुसार सुरू करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यंत्रसामग्री तयार झाली आहे, आता उत्पादनाचा वेग वाढवा, असे जिंदाल यांनी कामगारांना सांगितले. पायाभूत सुविधा तयार असून अपेक्षित उत्पादन उद्दिष्टे गाठण्यावर संपूर्ण टीमने लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पाच्या एकूण विकासाबद्दल कौतुक करतानाच, संपूर्ण परिसरात राखलेली स्वच्छता, सुव्यवस्था आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या 'SS' मानकांबद्दलही जिंदाल यांनी या भेटीत कौतुक केले.
भेटीदरम्यान त्यांनी पेंट शॉपमधील कामकाजाचीही पाहणी केली. यात पीटी/सीईडी प्रक्रिया आणि बसच्या रोबोटिक पेंटिंग प्रक्रियेचा समावेश होता. या प्रक्रियांतून प्रकल्पातील आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचे आणि प्रगत उत्पादन क्षमतेचे दर्शन घडले.
आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या जोरावर उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी जेएसडब्ल्यू ग्रीनटेकची टीम सज्ज झाली आहे. आता निर्धारित उत्पादन क्षमता गाठण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू आहे.