चंद्रपुरात महाकाली मंदिरात ५१ फूट उंच ध्वजारोहण, दुष्काळामुळे मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द
माता महाकाली महोत्सव २०२६ ची सुरुवात घटस्थापनेच्या दिवशी ध्वजारोहणाने झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाले असले, तरी धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रम सुरू राहणार आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेचे औचित्य साधून रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी श्री माता महाकाली मंदिरात ५१ फूट उंच ध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या वतीने आयोजित माता महाकाली महोत्सव २०२६ अंतर्गत हा सोहळा झाला.
आमदार किशोर जोरगेवार मंदिरात उपस्थित होते. त्यांनी चांदीच्या माता महाकाली मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर मातेची पालखी निघाली. यावेळी मनीष महाराज, सुनिल महाकाले, राजु शास्त्रकार, अजय जयस्वाल, श्याम धोपटे, मिलिंद गंपावार, बलराम डोडाणी, प्रसाद जोरगेवार, संजू बुरघाटे, अरुण तिखे, सविता दंढारे, वंदना हातगावकर यांच्यासह श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भक्त हजर होते.
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे, हे लक्षात घेऊन यंदा महोत्सवातील मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांवरचा खर्च वाचवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा मानस आहे. मात्र महोत्सवातील धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधून महोत्सवाची परंपरा जपण्यावर भर देण्यात आला आहे.
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर "महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या वेदना आणि अडचणी लक्षात घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करून त्या खर्चातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, माता महाकाली महोत्सवाची धार्मिक परंपरा आणि समाजोपयोगी उपक्रम सुरूच राहतील. मातेच्या आशीर्वादाने भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीची ही परंपरा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे."
ध्वजारोहणानंतर चांदीच्या माता महाकाली मूर्तीची विधिवत पूजा झाली. मग मूर्तीची पालखीतून रथापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. भजन-कीर्तनाच्या गजरात आणि वाजतगाजत हा रथ नितीन कुमरवार यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. यंदा चांदीची मूर्ती घरी नेऊन भाविकांना दर्शनाची संधी देण्याचा पहिला मान कुमरवार परिवाराला मिळाला.
नवरात्रोत्सवाच्या काळात माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीचे घरोघरी दर्शन घडवण्याची परंपरा आहे. त्यानुसार कुमरवार परिवाराच्या निवासस्थानी मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी ही मूर्ती नितीन कुमरवार यांच्या निवासस्थानावरून वाजतगाजत रामजीवन परमार यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे.
रद्द झालेले कार्यक्रम : १४ ऑक्टोबरपासून नियोजित असलेल्या पाच दिवसांच्या महोत्सवात भक्तिसंगीत गायक गजेंद्र प्रताप सिंह, हेमंत ब्रिजवासी, चौतन्य देवढे आणि गायिका जयपिंदर नरुला यांचे भक्तिमय गायन कार्यक्रम ठरले होते. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नियोजनाप्रमाणे होणारे कार्यक्रम : धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रम पूर्वनियोजित स्वरूपात सुरू राहतील. यात ९९९९ कन्यांचे पूजन व भोजन होणार आहे. सौभाग्यवती महिलांना अखंड सौभाग्याची कामना करत हिरवा चुडा भरून देण्याचा उपक्रमही होईल. नवरात्रीदरम्यान जन्मलेल्या कन्यांना चांदीचे नाणे दिले जाईल. १९ ऑक्टोबर रोजी नगरप्रदक्षिणाही काढण्यात येणार आहे.