देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्री बालाजी महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव देऊळगाव राजा येथे ११ ऑक्टोबरला घटस्थापनेने सुरू होणार आहे.
देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेले आणि सर्व भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या चरणी माथा टेकवण्यासाठी महाराष्ट्रासह राज्याच्या सीमेपलीकडूनही दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक देऊळगाव राजा येथे येत असतात.
यावर्षी यात्रा उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होईल. घटस्थापना आश्विन शु. १, रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. मंडपोत्सव आश्विन शु. ८ सह ९, सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
दसरा पालखी मिरवणूक आश्विन शु. ९ सह १० रोजी निघणार आहे. ती मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून सुरू होऊन बुधवार, दि. २१ ऑक्टोबरपर्यंत चालेल. लळीत उत्सव आश्विन कृ. ४, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सूर्योदयी सकाळी ५:४५ वाजता होणार आहे.
आश्विन यात्रा उत्सव दि. ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या काळात होईल. कार्तिक यात्रा उत्सव दि. १० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या काळात होणार आहे.
यात्रा उत्सवादरम्यान भाविकांनी श्री बालाजी महाराजांचे दर्शन घ्यावे आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयंसिंह जाधव आणि व्यवस्थापक श्री किशोर बीडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री बालाजी महाराजांच्या वार्षिक उत्सवांसाठी श्रींचे सर्व भक्त लगबगीने कामालाही लागले आहेत. दरवर्षी वृत्तपत्रांतून बातमी, जाहिरात, लेख आणि संकलित माहिती यांच्या आधारे उत्सवांचा आणि यात्रेचा सर्वदूर प्रसार व प्रचार करणाऱ्या पत्रकारांसाठी यंदाही श्री बालाजी संस्थानतर्फे प्रचार आणि प्रसाराच्या नियोजनासाठी सर्व पत्रकार बंधू व भगिनींची सहविचार सभा आयोजित करण्यात आली.
याशिवाय श्री बालाजी महाराजांच्या सर्वे नंबर ९८ वरील यात्रेच्या नियोजनासाठी श्री बालाजी संस्थान पुरस्कृत जागावाटप समितीच्या सदस्यांची अंतर्गत सहविचार सभाही घेण्यात आली. यात्रेच्या तयारीसाठी संस्थानकडून अशा प्रकारे वेगवेगळ्या पातळ्यांवर बैठका घेतल्या जात आहेत.
शासन परिपत्रकांनुसार यात्रेचा व्यवस्थापन आराखडा आणि प्रमाणित कार्यपद्धती (SOP) मा. जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित करावी, त्यामध्ये सर्व संबंधित विभागांची कर्तव्ये व जबाबदारी निश्चित करावी, तसेच उत्सव आणि यात्रेला परवानगी द्यावी, अशी मागणी श्री बालाजी संस्थानतर्फे सविस्तर पत्र पाठवून मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.