बुलढाणा जिल्ह्यातील ३३७ ग्रंथालयांपैकी ३१ फक्त नावापुरती, वाचकांनी फिरवली पाठ
मोबाइल आणि इंटरनेटच्या वापरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील वाचनालयांत वाचक कमी झाले असून वाचन चळवळीसमोर संकट उभे आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बुलढाणा जिल्ह्यात एकूण ३३७ ग्रंथालये आहेत. त्यापैकी ३०६ ग्रंथालये कार्यक्षम असल्याने त्यांना शासनाचे अनुदान मिळते, तर उरलेली ३१ ग्रंथालये अकार्यक्षम असून ती फक्त नावापुरतीच असल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती मिळाली.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर इतका वाढला आहे की मानवी जीवनच पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी करमणूक, माहिती आणि ज्ञानाचे मुख्य केंद्र असलेल्या ग्रंथालयांकडे आता वाचकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. वाचन संस्कृती जपणारी ही हक्काची ठिकाणे ओस पडत चालली आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्व वाचनालयांत वाचकच नाहीत किंवा फारच कमी आहेत, त्यामुळे ती ओसाड वाटतात.
वर्तमानपत्र वाचणाऱ्या वयस्कर मंडळींपासून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी जास्त सोयीसाठी खाजगी वाचनालय निवडले आहे. सर्वदूर पोहोचलेल्या इंटरनेटमुळे हवी ती माहिती घरबसल्या आणि कमी वेळात मिळू लागली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन आहे. त्यामुळे ताज्या बातम्या, स्पोर्ट्स, राजकारण, सांस्कृतिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा कथा, कादंबऱ्या, जीवनचरित्रे वाचण्यासाठी वाचक वाचनालयाकडे येत नाही. कुकु एफएम, पॉकेट एफएम यांसारख्या सेवांमुळे या सुविधाही सोयीस्कर झाल्या आहेत.
विद्यार्थी, शेतकरी आणि वाचनाची आवड असणाऱ्यांना वाचनाचा छंद जोपासता यावा, या उदात्त हेतूने शासनाने ठिकठिकाणी वाचनालये सुरू केली. जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विविध पुस्तके वाचायला मिळावीत आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, तसेच शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, असा यामागचा उद्देश आहे. वाचनाची आवड असणाऱ्यांना कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, बालसाहित्य आणि गडकिल्ल्यांवर आधारित पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.
शासनाकडून अ, ब, क, ड वर्गातील वाचनालयांना नियमित अनुदान वाटप केले जाते. यात 'अ' वर्गातील ग्रंथालयाला ११ लाख ५२ हजार रुपये, 'ब' वर्गासाठी ३ लाख ९० हजार रुपये, 'क' वर्गासाठी १ लाख ५३ हजार रुपये आणि 'ड' वर्गासाठी ४८ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
इंटरनेट आणि डिजिटल सुविधा नसल्यामुळे मध्यंतरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनालयांकडे पाठ फिरवली होती. मात्र जिल्ह्यात १५ ते २० वाचनालये डिजिटल झाल्याचे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पुस्तके मनाला समृद्ध करतात, विचारांना प्रगल्भ करतात आणि योग्य-अयोग्य यातील फरक समजावतात. मात्र सोशल मीडियामुळे वाचकवर्ग दूर गेल्याने वाचन चळवळीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करून त्यांना अधिक आकर्षक बनवणे आणि शासनाने नियमित अनुदान देऊन वाचन संस्कृती टिकवणे, ही काळाची गरज बनली आहे.