कुलदेवीच्या मंदिरात जाता न आल्यास घरीच ओटी भरता येते; नवरात्रातील पूजेची पद्धत
शारदीय नवरात्राला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. मंदिरात जाणे जमले नाही तरी कुलदेवीची ओटी आणि पूजा घरी कशी करायची, याची माहिती.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शारदीय नवरात्राला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवीचे दर्शन घेणे आणि तिची ओटी भरणे याला खूप महत्त्व दिले जाते.
पण कधी अंतर लांब असते, कधी तब्येत बरी नसते, तर कधी आणखी काही अडचण येते आणि कुलदेवतेच्या मंदिरात जाणे जमत नाही. अशा वेळी घरीच पूजा केली तर चालते का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या एका देवीला कुलदेवी मानले जाते. नवरात्रात तिच्या मंदिरात जाऊन हळद-कुंकू वाहणे, ओटी भरणे आणि नैवेद्य दाखवणे केले जाते. यामुळे घरावर देवीची कृपा राहते, असे मानले जाते. मात्र नवरात्रात मंदिरात गेलेच पाहिजे असा कोणताही नियम नाही.
काही कारणाने जाता आले नाही, तर घरी देवीची आठवण काढून पूजा करता येते. देवी फक्त मंदिरातच नाही, तर मनात आणि घरातही आहे. त्यामुळे घरातल्या मोठ्या माणसांना किंवा गुरुजींना विचारून घरच्या घरी पूजा करता येते.
महाराष्ट्रात देवीची ओटी भरण्याची खूप जुनी परंपरा आहे. मंदिरात जाताना लोक साडी किंवा खण, नारळ, हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पान आणि फुले घेऊन जातात. मंदिरात जाता आले नाही तर टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण ओटी घरीही भरता येते. त्यासाठी आधी देवघर स्वच्छ करायचे.
त्यानंतर देवीच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहायची. मग एका ताटात साडी किंवा खण, नारळ आणि पूजेचे जे काही सामान असेल ते ठेवून ताट देवीसमोर ठेवायचे. मनापासून नमस्कार करून प्रार्थना करायची, आणि शेवटी आरती करून नैवेद्य दाखवायचा. प्रत्येक घराची ओटी भरण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे घरात जशी पद्धत आहे तशीच पूजा करावी.
नवरात्राच्या नऊ दिवसांत रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आणि देवघरात दिवा लावायचा. कुलदेवीचे नाव घेऊन तिला फुले वाहायची. कुलदेवीचा मंत्र माहीत असेल तर त्याचा जप करायचा. माहीत नसेल, तर सर्वात सोपा मंत्र 'ॐ दुं दुर्गायै नमः' याचा जप केला तरी चालतो.
रोज देवीची आरती म्हणायची, एखादे स्तोत्र वाचायचे आणि सात्विक नैवेद्य दाखवायचा. काही घरांमध्ये घट बसवतात, अखंड दिवा लावतात. हे सगळे घराच्या परंपरेनुसार आणि आपापल्या वेळेनुसार करावे. दुसऱ्याचे बघून जास्त काही करण्याची गरज नाही, कारण श्रद्धेने केलेली छोटी पूजाही देवीपर्यंत पोहोचते.
ओटी भरण्यासाठी एखादा खास दिवस असतो, असे अनेकांना वाटते. पण तसे नाही. काही घरांमध्ये पंचमीला, काही घरांमध्ये अष्टमीला, तर काही घरांमध्ये नवमीला ओटी भरली जाते. ज्या घरात ज्या दिवशी भरण्याची पद्धत असेल, त्या दिवशी भरावी. काहीच माहिती नसेल, तर नवरात्रातल्या कोणत्याही एका दिवशी सोयीनुसार ओटी भरली तरी चालते.
मंदिरात गेलो नाही तर देवी रागावेल किंवा काही वाईट होईल, अशी भीती अनेकांना वाटते. पण असे काहीच नसते. देवीला माता म्हटले जाते, आणि आई आपल्या लेकरांवर कधी रागावते का? घरात घटस्थापना करता येते, किंवा श्रद्धेने तिचे नाव घेतले तरी ती खुश होते. नवरात्रात देवी पृथ्वीतलावर येऊन वाईट गोष्टींचा नाश करून आपल्यासोबत घेऊन जाते. देवीने महिषासुराला मारून सगळ्यांना वाचवले, त्यामुळे या दिवसांत फक्त पूजाच नाही, तर मनातली भीती, राग आणि वाईट विचारही दूर करायचे असतात. घरात सगळ्यांनी एकत्र येऊन पूजा, आरती केल्याने घरात एकोपा राहतो आणि संस्कृतीही जपली जाते.