बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:01 IST

म्हाळुंगे पश्चिम पुण्यातील नवे रिअल इस्टेट हॉटस्पॉट, हिंजवडीजवळ घरांना मागणी

बाणेर-वाकडनंतर आता म्हाळुंगे परिसराकडे गृहखरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांचा कल वाढला आहे.

म्हाळुंगे पश्चिम पुण्यातील नवे रिअल इस्टेट हॉटस्पॉट, हिंजवडीजवळ घरांना मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

साधारण दहा वर्षांपूर्वी पश्चिम पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सीमेवर स्वतःचे घर घ्यायचे म्हटले की बाणेर, बालेवाडी किंवा वाकड एवढेच पर्याय समोर असायचे. गेल्या काही वर्षांत शहराचा विकास झपाट्याने पसरला आणि आता गृहखरेदीदार तसेच बांधकाम क्षेत्रात म्हाळुंगे हे नाव आघाडीवर आले आहे. हिंजवडी आयटी हबचा होत असलेला विस्तार, चांगले दळणवळण आणि नियोजनबद्ध टाउनशिपसाठी उपलब्ध असलेले मोठे भूखंड यामुळे म्हाळुंगे हे पश्चिम पट्ट्यातील नवे निवासी केंद्र म्हणून आकार घेत आहे.

म्हाळुंगेच्या या बदलामागे त्याचे मोक्याचे स्थान हे सर्वात महत्त्वाचे कारण ठरले आहे. आशियातील सर्वात मोठ्या आयटी केंद्रांपैकी एक असलेल्या हिंजवडीच्या अगदी जवळ हा परिसर आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला थेट कनेक्टिव्हिटी आहे, तसेच बाणेर, बालेवाडी आणि वाकड या विकसित भागांना जोडणारे अंतर्गत रस्तेही आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणे सोपे झाले आहे. पीएमआरडीएअंतर्गत पहिल्या हाय-टेक टाउनशिप योजनेमुळे येथे नियोजनबद्ध विकास होत आहे.

वाकड आणि बाणेरसारख्या जुन्या, स्थिरावलेल्या भागांत बांधकामाची घनता खूप वाढली आहे आणि नव्या प्रकल्पांसाठी जागा कमी पडू लागली आहे. म्हाळुंगेमध्ये मात्र अजूनही मोठे भूखंड उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना आधुनिक जीवनशैली आणि नियोजनबद्ध सोयीसुविधा एकाच ठिकाणी देणारे भव्य प्रकल्प उभारता येत आहेत.

बांधकाम क्षेत्रातील गेरा पुणे निवासी स्थावर मालमत्ता अहवालानुसार, पश्चिमोत्तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडला लागून असलेल्या पट्ट्यात म्हणजेच हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि म्हाळुंगे येथे घरखरेदीत मोठी तेजी दिसली आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत या पट्ट्यात १२ हजार १२० घरांची विक्री झाली. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ २९ टक्के आहे.

घरांच्या दरांचा आलेखही वर गेला आहे. २०२१ मध्ये म्हाळुंगे परिसरात घरांचा सरासरी दर प्रति चौरस फूट ६ हजार २९८ रुपये होता. २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत हा दर प्रति चौरस फूट ९ हजार १४५ रुपयांवर पोहोचला आहे. साध्या शब्दांत सांगायचे तर, २०२१ मध्ये सरासरी १ हजार चौरस फुटांच्या घरासाठी ग्राहकाला सुमारे ६३ लाख रुपये मोजावे लागत होते, तेच घर आज सुमारे ९१ लाख रुपयांवर गेले आहे. पाच वर्षांत घरांच्या दरात ४५ टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

म्हाळुंगेच्या विकासाला खरी गती पायाभूत सुविधांमुळे मिळाली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरू होणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३ मुळे हिंजवडी हे रोजगारकेंद्र शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडले जाणार आहे. म्हाळुंगे थेट या कॉरिडॉरच्या शेजारी असल्याने इथल्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वेगवान आणि पर्यावरणपूरक पर्याय मिळत आहे.

या भागात फक्त घरे बांधली जात नाहीत. शैक्षणिक संस्था, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, व्यापारी संकुले, मनोरंजन केंद्र आणि प्रशस्त अंतर्गत रस्त्यांचे जाळे वेगाने उभे राहत आहे. त्यामुळे म्हाळुंगे हे केवळ उपशहर न राहता एका स्वावलंबी निवासी संकुलात (इकोसिस्टम) रूपांतरित होत आहे.

सध्या व्हीटीपी रिअॅल्टी आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील विकासकांचे मोठे गृहप्रकल्प इथे उभे राहिले आहेत. व्हीटीपी बेलिसिमो, व्हीटीपी टाउन स्क्वेअर, व्हीटीपी एथेरियस तसेच गोदरेज हिलसाइड इस्टेट आणि मेडोज या प्रकल्पांमुळे परिसराचे रूपच पालटले आहे. जुन्या नागरी वस्त्यांच्या तुलनेत म्हाळुंगे हे आधुनिक पिढीच्या, विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीला साजेसे हाय-टेक टाउनशिप म्हणून ओळखले जात आहे. आगामी काळात पश्चिम पट्ट्यातील गुंतवणूक आणि निवासाचे ते प्रमुख केंद्र ठरेल, असे अपेक्षित आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ