डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या कंपनीने वरळीतील आलिशान अपार्टमेंट महिना 28.5 लाख रुपये भाड्याने दिले
'थ्री सिक्स्टी वेस्ट' मधील अपार्टमेंट तीन वर्षांसाठी लीजवर देण्यात आले असून मुंबईतील सर्वाधिक महागड्या रेंटल डीलपैकी हा एक व्यवहार मानला जात आहे.
डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्याशी संबंधित कंपनीने मुंबईतील वरळी येथे एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. हे अपार्टमेंट 'थ्री सिक्स्टी वेस्ट' मध्ये असून ते तीन वर्षांसाठी लीजवर देण्यात आले आहे. मुंबईतील सर्वाधिक महागड्या रेंटल डीलपैकी हा एक व्यवहार मानला जात आहे.
मुंबईच्या अल्ट्रा-लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये या व्यवहारामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ग्राहकांच्या पसंतीच्या 'डी-मार्ट' शॉप्सचे संस्थापक म्हणून राधाकिशन दमानी यांची ओळख आहे. त्यांच्याशी संबंधित कंपनीने वरळी इथले हे आलिशान अपार्टमेंट लीजवर दिले आहे.
या व्यवहाराची नोंदणी आणि कागदपत्रांची माहिती समोर आली आहे. त्यानुसार या अपार्टमेंटचे भाडे जवळपास 28.5 लाख रुपये महिना इतके आहे. हे अपार्टमेंट वरळीतील डॉ. अॅनी बेझंट रोडवर, 'थ्री सिक्स्टी वेस्ट' या लक्झरी प्रोजेक्टमध्ये आहे. टॉवर क्रमांक बी मधील 19 व्या मजल्यावर हे घर असून त्याचे क्षेत्रफळ 6,831 चौरस फूट आहे. अपार्टमेंटबरोबर चार गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्थाही देण्यात आली आहे.
हा लीजचा व्यवहार 28 सप्टेंबर 2026 रोजी झाला आणि त्याची नोंदणीही करण्यात आली आहे. कराराचा कालावधी 36 महिन्यांचा आहे, म्हणजे हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे. सुरुवातीला मासिक भाडे 28.5 लाख रुपये असणार आहे. म्हणजेच केवळ तीन वर्षांच्या भाड्याची रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार आहे.
या व्यवहारात 1.71 कोटी रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट भरण्यात आली आहे. या आलिशान अपार्टमेंटसाठी भाडेकरू कंपनीने ही रक्कम जमा केली आहे. अपार्टमेंटचा भाडेकरू म्हणून आयव्हीएल धनसेरी पेट्रोकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव नोंदवण्यात आले आहे.
2026 मध्ये मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेटमध्ये वरळी हा प्रमुख स्पॉट ठरत आहे. 5 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या व्यवहारांत वरळीने बाजी मारली आहे. लक्झरी रेंटल मार्केटमध्येही या परिसराचा मोठा वाटा आहे.