बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:32 IST

अमरावतीत कोणार्क कंपनीचे काम कोलमडले, घरोघरी कचरा संकलन ठप्प; दारांपुढे कचऱ्याचे ढीग

अनेक भागांत कचऱ्याच्या गाड्या महिनाभर फिरकल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही नियमित मिळत नसल्याचा आरोप आहे.

अमरावतीत कोणार्क कंपनीचे काम कोलमडले, घरोघरी कचरा संकलन ठप्प; दारांपुढे कचऱ्याचे ढीग छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अमरावती शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्या कोणार्क कंपनीकडे सोपवण्यात आली आहे, त्या कंपनीच्या कामाच्या पद्धतीमुळे नागरिकांना सध्या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक भागांत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या गाड्या महिनाभर फिरकल्याच नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

गणेशोत्सवापासून कचऱ्याची समस्या वाढत गेली असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही ही व्यवस्था सुरळीत का होत नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शहरात नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांमध्येही कचरा संकलन विस्कळीत झाले आहे. पूर्वी दर दोन दिवसांनी येणाऱ्या गाड्या आता १५ ते २० दिवसांनी येतात, असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. सारंग बोलके यांनी, स्वच्छता शुल्क आकारणाऱ्या महापालिकेने नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. गृहिणी रोना घाडगे यांनी घरात कचरा किती दिवस साठवून ठेवायचा, असा सवाल केला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्याच्या समस्यांचा धोकाही वाढत आहे.

दुसरीकडे, कोणार्क कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याचा आरोप आहे. वेतन दोन महिन्यांपर्यंत प्रलंबित राहते, किमान वेतनापेक्षा कमी मोबदला दिला जातो, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रकमांमध्ये अनियमितता आहे, तसेच वेतनपत्रिका दिली जात नाही, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या संदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. कंपनीच्या नोंदींची चौकशी करावी, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

वाहनांची कमतरता हेही या परिस्थितीचे एक कारण सांगितले जाते. महापालिकेने कंपनीला १०० हून अधिक वाहने उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पूर्वीच्या कंत्राटदारांकडून भाड्याने घेतलेली वाहने न्यायालयीन प्रक्रियेनंतर परत करण्यात आली. त्यामुळे उपलब्ध वाहनांची संख्या ७० हून अधिकने घटल्याचे सांगण्यात येते. याचा थेट परिणाम घरोघरी होणाऱ्या कचरा संकलनावर झाला आहे.

कोणार्क कंपनीला पूर्ण क्षमतेने स्वच्छतेचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांच्या कमतरतेमुळे काही भागांत कचरा संकलन विस्कळीत झाले असून, परिस्थिती सुधारत आहे, असे सांगण्यात आले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ